प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
केंद्र सरकारने फेसबूकला पर्यायी स्वदेशी ‘ॲप’ विकसित करावे ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा
देशातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांना विदेशी आस्थापनाकडून लक्ष्य केले जात आहे. फेसबूकने ‘सुदर्शन न्यूज’ सारख्या हिंदुत्वनिष्ठ वाहिनीच्या पानावर बंदी घातली, तर दुसरीकडे आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणार्या डॉ. झाकीर नाईक, हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे अकबरुद्दीन ओवैसी, पाकिस्तानमधील अनेक आतंकवादी संघटना यांची फेसबूक, ट्विटर आदी सामाजिक माध्यमांवरील खाती चालू आहेत. ट्विटरकडून देशाच्या उपराष्ट्रपतींचे, तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अधिकृत खात्याचे ‘ब्ल्यू टीक’ काढले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली, तरी सामाजिक माध्यमातून विदेशी लोक आपल्यावर राज्य करत आहेत. आपण कधीपर्यंत विदेशी ‘फेसबूक’ला सहस्रो कोटी रुपये कमवून देणार आहोत ? हे थांबवण्यासाठी ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर केंद्र सरकारने फेसबूकप्रमाणे स्वदेशी ‘ॲप’ विकसित केले पाहिजे.
फेसबूकचा मनमानी कारभार चालू देणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षण, धर्मजागृती, हिंदूसंघटन, समाजसाहाय्य, हिंदु संस्कृतीचे जतन, आचारधर्म आणि धर्माचरण यांविषयीचे कार्य घटनात्मक मार्गाने करत आहे; मात्र तरीही फेसबूकने समितीची ३५ पाने कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केली. याउलट रझा अकादमी, नक्षल समर्थक हे मानवजातीला नष्ट करण्याचे आणि भावना भडकावण्याचे कार्य करत आहेत, हे फेसबूकला आक्षेपाह वाटत नाही का ? तेथे राज्यघटनाविरोधी भाषा वापरलेली पाने आहेत. हिंदूंचा आवाज दाबण्याचे फेसबूकचे हे षड्यंत्र असून आम्ही त्यांचा मनमानी कारभार चालू देणार नाही. भारतियांच्या बोलण्याचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांवर गदा येत असल्यास फेसबूकला हद्दपार करण्याची अन् त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याची आवश्यकता आहे.
आता फेसबूकवरच भारत सरकारने बंदी आणावी ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
‘टाइम’सारख्या विदेशी प्रसिद्धीमाध्यमाने अहवाल दिला, म्हणून फेसबूकने सनातन संस्था, सनातन प्रभात, सनातन शॉप, हिंदु जनजागृती समिती यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठांची फेसबूक पाने बंद केली आहेत. कोणतेही ठोस कारण नसतांना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात हस्तक्षेप करून अशा प्रकारे निवडक पाने बंद केली जात असतील, तर फेसबूकवरच सरकारने बंदी आणावी, अशी आमची मागणी आहे.