पर्वरी, गोवा येथील श्रीमती सविता गांवस यांच्याविषयी रामनाथी आश्रमात रहाणारी त्यांची मुलगी कु. सिद्धी गांवस हिला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. कष्टाळू
अ. ‘माझ्या आईने मध्यंतरी २ – ३ मास नोकरी केली होती. तेव्हा तिला बसने पणजीला जावे लागत असे. बसथांब्यावर जाण्यासाठी तिला आमच्या गावातून २ कि.मी. चालत जावे लागत असे. त्यासाठी आई सकाळी लवकर उठून घरातील कामे आणि स्वयंपाक करत असे. आमची शाळेला जाण्याची सिद्धता करून ती ८.३० ते ९ वाजेपर्यंत घरातून निघत असे.
आ. ती रुग्णाईत असली, तरी घरातील कामे रात्री उशिरापर्यंत जागून एकटीच पूर्ण करते.
इ. बाबा रुग्णाईत असतांना तिला बाबांच्या सेवेसाठी रात्री पुष्कळ वेळा उठावे लागायचे आणि तिला झोपायला रात्री १२ – १ वाजायचे, तरी ती दुसर्या दिवशी बाबांची सर्व सेवा करायची. बाबांचे नेहमी पथ्याचे जेवण वेगळे करावे लागायचे. ते ती विनातक्रार करायची.
२. वाक्चातुर्य
घरातील सदस्यांमध्ये कधी कधी वाद झाल्यास आई गंमतीने आणि चतुराईने बोलून वाद थांबवते.
३. शिकण्याची वृत्ती
बाबांच्या निधनानंतर मला शाळेत पोचवण्यासाठी आणि शाळेतून घरी आणण्यासाठी ती दुचाकी चालवायला शिकली.
४. मुलीवर धर्माचरणाचे संस्कार करणे
आईने मला लहानपणापासून कधी ‘जीन्स, टी शर्ट, टॉप’ असे कपडे घालू दिले नाहीत. माझ्यावर लहानपणापासून सात्त्विकतेचे संस्कार झाले.
५. सकारात्मक
अ. बाबांना व्यसनामुळे तीव्र स्वरूपाचे शारीरिक त्रास झाले, तरी आईने कधी त्यांना दोष दिला नाही किंवा ‘मला किती कष्ट करावे लागतात’, असेही कधी तिला वाटले नाही. ‘तिच्याकडून जे काही होते, ते ईश्वरच तिच्याकडून करवून घेतो’, असे तिला वाटते.
आ. आईने परिस्थितीविषयी इतरांकडे कधीही तक्रार केली नाही किंवा ‘मलाच एवढे त्रास का ?’, असा त्रागाही तिच्या बोलण्यातून कधी व्यक्त होत नाही. ती सर्व स्वीकारते.
६. शांत असणे आणि इतरांचा विचार करणे
अ. वर्ष २०१९ मध्ये दादाला (श्रीमती सविता गांवस यांचा मोठा मुलगा श्री. सुधीर गावस) आणि मला आश्रमात रहावेसे वाटत असल्यामुळे तिने आम्हा दोघांना पूर्णवेळ साधक होऊ दिले. आम्हाला आश्रमात रहाण्यास अनुमती देऊन ती घरी एकटी रहाते.
आ. बाबांना व्यसन होते. ‘बाबांनी व्यसन सोडून द्यावे’, यासाठी ती कधीही त्यांच्याशी भांडली नाही. ती बाबांना समजून घेत असे आणि त्यांना समजावून सांगत असे.
इ. बाबांना त्रास होत असतांना त्यांना राग यायचा किंवा त्यांची चिडचिड व्हायची. तेव्हा ते आईला ओरडायचे, तरीही तिने बाबांना कधी उलट उत्तर दिले नाही. तिने सर्व मुकाट्याने सहन केले. ती शांत राहून त्यांना समजून घ्यायची.
ई. मी तिला काही अडचणी सांगितल्यास ती शांत आणि स्थिर राहून माझी अडचण समजून घेते. ती कधी आमच्यावर चिडली नाही कि आम्हाला ओरडली नाही.
उ. माझ्या मोठ्या भावाला आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे तो प्रतिक्रियात्मक बोलतो, तरी ती त्याला समजून घेते.
७. इतरांना साहाय्य करणे
७ अ. शेजारी रुग्णाईत असतांना किंवा त्यांच्या अडचणीच्या वेळी आई त्यांना साहाय्य करते.
७ आ. लहान आत्याची प्रेमाने काळजी घेणे : माझी लहान आत्या रुग्णाईत असतांना आई आणि बाबा यांनी तिची काळजी घेतली. तिच्यासाठी पैसे व्यय करावे लागत होते. बाबांची प्रकृतीही बरीच खालावलेली होती, तरीही त्या स्थितीत आई आणि बाबांनी चांगले रुग्णालय शोधणे, तिला रुग्णालयात भरती करणे, तेथे तिची सर्व प्रकारे काळजी घेणे, असे सर्व मनापासून केले. लहान आत्याला शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास आहे. तिला सासरी बघणारे कुणी नाही; म्हणून आई आत्याला घरी ठेवून घेण्यास सिद्ध असते. एकदा पावसाळ्यात जोराचा पाऊस पडत होता. बाबांची प्रकृती ठीक नव्हती, तरीही आत्याला रुग्णालयात भरती केल्यावर आई-बाबा दोघेही रुग्णालयात गेले होते.
७ इ. कौटुंबिक दायित्व निभावणे : बाबांच्या निधनानंतरही आईने आत्याची काळजी घेतली. घरातील अन्य सदस्यांसाठी पैसे व्यय करावे लागले, तरी तिला त्याचे काही वाटत नाही. बाबा भावंडांत मोठे आहेत. त्यामुळे बाबांवर घराचे दायित्व होते. बाबा गेल्यानंतरही आई मोठी सून म्हणून तिची सर्व कर्तव्ये पार पाडते.
८. प्रेमभाव
अ. आम्ही आश्रमातून घरी जाणार असल्यास ती घराची स्वच्छता करते. ‘आम्हाला घरी आल्यावर चांगले वाटायला पाहिजे’, असे तिला वाटते.
आ. आई आजीवर (सासूबाईंवर) पुष्कळ प्रेम करते. ‘आजी तिची आई आहे’, असा तिचा भाव असतो. आई आजीच्या पथ्यानुसार आणि तिला आवडेल असा स्वयंपाक करते.
इ. एखादी गोष्ट मला हवी असेल आणि ती घेणे आवश्यक नसेल, तरी ती तिचा विचार माझ्यावर न लादता मला शांतपणे समजावून सांगते.
९. स्वीकारण्याची वृत्ती
अ. आईचे लग्न झाले असतांना बाबांचे घर फारच लहान होते. एक लहान खोली आणि तीही व्यवस्थित बांधलेली नव्हती, तरीही आईने कधी गार्हाणे केले नाही.
आ. घरातील सदस्यांचा स्वभाव पूर्ण सकारात्मक नव्हता, तरीही ती मिळून-मिसळून राहिली. तेव्हा घरात एकूण २० जण होते. आत्या आणि त्यांची मुलेही आमच्याकडे रहात होती. आईने त्यांचीही काळजी प्रेमाने घेतली.
१०. अपेक्षा नसणे
मी आणि दादा शिकत असतांना तिची ‘आम्ही चांगले गुण मिळवावे किंवा प्रथम क्रमांक मिळवावा’, अशी अपेक्षा नव्हती; मात्र तिला ‘आम्ही चांगले आणि सद्गुणी व्यक्ती बनायला हवे’, असे वाटते.
११. स्थिर
अ. बाबा रुग्णाईत असतांना त्यांना अनेक वेळा रुग्णालयात घेऊन जावे लागायचे, तरीही आईची कधीही चिडचिड झाली नाही.
आ. बाबांचा मधुमेह वाढल्यावर त्यांना रुग्णालयात भरती केले होते. तेव्हा बाबांच्या पायाचे बोट कापावे लागले. तेव्हा तिने ते स्थिरतेने स्वीकारले. त्या वेळी रुग्णालयात काकू आणि आई दोघीच होत्या.
इ. बाबांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या पूर्ण अंगाला सूज आली होती. त्यांच्या देहात पाणी झाले होते, तरी ती स्थिर होती.
ई. ‘बाबांचे निधन होणे’, हे सर्व प्रारब्धानुसार घडत असल्याचे तिने अल्पावधीतच स्वीकारले. परात्पर गुरु डॉक्टरांवर तिची दृढ श्रद्धा आहे. त्यामुळे बाबांच्या निधनानंतर ती खचून गेली नाही.
१२. सेवाभाव
अ. बाबांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांना मधे चक्कर येऊन ते बेशुद्ध व्हायचे. तेव्हा त्यांना २ – ३ वेळा तातडीने रुग्णालयात न्यावे लागले. तेव्हा ती स्थिर राहून आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून सर्व करायची.
आ. आई वेळोवेळी बाबांना जेवण भरवणे, ‘इन्सुलीन’चे इंजेक्शन देणे आणि पोटाला शेक देणे आदी सर्व करायची.
इ. एकदा आई रुग्णाईत असतांना आजी रुग्णाईत झाली होती. तेव्हा ती स्वतः रुग्णाईत असूनही तिने आजीला रुग्णालयात भरती केले आणि ती आजीच्या समवेत रुग्णालयात रहायला गेली. ती आजीचे कपडे आणि अंथरुण धुवायची. आजीची काळजी नीट घेतली जावी; म्हणून तिने आजीला आमच्या घरी रहायला आणले.
१३. अल्प अहं
अ. मी रागाने चिडचिड केली, तरी ती स्वतः न्यूनता घेऊन क्षमा मागते.
आ. ती कुठेही गेली, तरी सहजतेने इतरांमध्ये मिसळते. ती स्वतःचे वेगळे अस्तित्व जपत नाही. आईचे रहाणीमान साधे आहे.
१४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कौतुकाला पात्र ठरलेली आई !
मी परात्पर गुरु डॉक्टरांना एका सत्संगात ‘आई तिच्या सासूबाईंची पुष्कळ चांगली सेवा करते’, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्यांची साधना पुष्कळ चांगली चालू आहे. त्यांची सर्व गुणवैशिष्ट्ये लिहून द्या. ‘त्यांची प्रगती चांगल्या प्रकारे होत आहे’, हे इतरांनाही शिकायला मिळेल.’’
१५. कृतज्ञताभाव
अ. मी तिला घरकामात थोडेसे साहाय्य केले, तरी तिला पुष्कळ कृतज्ञता वाटते.
आ. बाबांच्या निधनानंतर आईला लोक भेटायला आल्यावर ती त्यांना देवाने तिला केलेल्या साहाय्याविषयी कृतज्ञताभावाने सांगायची.
१६. अनुभूती
१६ अ. ‘देवच सर्व करवून घेतो’, असा भाव असल्याने देवाने तशीच अनुभूती देणे : ती ‘स्टेनोग्राफी आणि टाईपिंग’ शिकली होती. तिची झोप अपुरी झाल्याने आणि दमल्यामुळे टंकलेखन करतांना तिला पुष्कळ झोप यायची. एकदा असेच टंकलेखन करतांना तिला ग्लानी आल्याने ती चुकीचे टंकलेखन करत होती, तरीही पडद्यावर टंकलेखन योग्य प्रकारे येत होते. तेव्हा आईला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘देवच तिच्याकडून सर्व करवून घेत असतो’, असे तिला वाटले. तिला आलेली ही अनुभूती तिच्या सहकारी महिलेच्याही लक्षात आली.
‘माझी आणि दादाची चांगली साधना व्हावी’, यासाठी स्वतःचा विचार न करता आम्हाला पूर्णवेळ साधना करू देणारी आई ईश्वराने आम्हाला दिली, यासाठी मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. सिद्धी गांवस (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.६.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |