पणजी, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – दिवसा पथदीप चालू असल्यास किंवा विजेचे ‘स्वीच बॉक्स’ खुले राहिल्यास ‘१९१२’ या २४ घंटे आणि ३६५ दिवस चालू रहाणार असलेल्या विनामूल्य ‘हेल्पलाईन’ क्रमांक ‘१९१२’ वर संपर्क साधण्याचे आवाहन वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनात विचारलेल्या एका प्रश्नावर वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी उत्तरादाखल हे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘दिवसा पथदीप चालू असल्याचे कुणाला आढळल्यास त्याविषयी ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर तक्रार करावी. ही तक्रार संबंधित उपकेंद्राकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. विजेचे ‘स्वीच बॉक्स’ उघडे असल्यास त्याचे सर्वेक्षण करून त्यात आवश्यक दुरुस्ती करण्याचे आदेश ‘लाईनमन’ला देण्यात आले आहेत.’’
‘सुराज्य अभियाना’च्या माध्यमातून वीजमंत्र्यांकडे केली होती दिवसा चालू रहाणारे पथदीप बंद करून अपव्यय थांबवण्याची मागणी
दिवसा पथदीप बंद करून अपव्यव थांबवण्याची मागणी ‘सुराज्य अभियाना’च्या माध्यमातून वीजमंत्र्यांकडे ऑक्टोबरच्या प्रारंभी करण्यात आली होती. दिवस उजाडल्यानंतर पथदीप बंद करण्याची सोय उपलब्ध करणे, कामचुकार सरकारी कर्मचार्यावर कारवाई करणे आणि शहर आणि ग्रामीण भागांतील वीज केंद्रांच्या वतीने यावर नजर ठेवण्यासाठी नियंत्रण पथक नेमावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली होती.