फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) येथील श्री बिसारी देवीच्या मंदिराची बौद्धांकडून तोडफोड

  • भगवा ध्वज काढून पंचशील ध्वज फडकावला !

  • मंदिराची हानीभरपाई करण्याचे उपजिल्हाधिकार्‍यांचे लेखी आश्‍वासन

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांची अशा प्रकारे तोफडोड होणे हिंदूंना अपेक्षित नाही. संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक
  • ‘बौद्ध म्हणजे शांतीचा धर्म’ असे म्हटले जाते; मात्र ही घटना पहाता, ते चुकीचे आहे, असे आता समजायचे का ? – संपादक
श्री बिसारी देवीच्या मंदिराची बौद्धांकडून तोडफोड

फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) – येथील संकिसा बौद्ध तीर्थक्षेत्रामधील श्री बिसारी देवी मंदिराची बौद्ध धर्मातील काही जणांनी तोडफोड करत मंदिरावर लावण्यात आलेला भगवा ध्वज काढून तेथे पंचशील ध्वज लावला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण होऊन दगडफेकीची घटना घडली. यात काही जण घायाळ झाले. २० ऑक्टोबरला धम्म यात्रेच्या वेळी ही घटना घडली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आदी अधिकारी पोचले. उपजिल्हाधिकार्‍यांनी ‘मंदिराच्या झालेल्या हानीची भरपाई करण्यात येईल’,  असे लेखी आश्‍वासन दिले.

बौद्धांचा दावा आहे की, हे धार्मिकस्थळ बौद्ध स्तूप असून येथे भगवान बुद्धांचे ‘स्वर्गावतरण’ (स्वर्गातून पृथ्वीवर येणे) झाले होते, तर दुसरीकडे हिंदूंचा दावा आहे की, येथे श्री बिसारी देवीचे प्राचीन मंदिर आहे आणि येथे श्री हनुमानाचीही मूर्ती आहे. गेल्या ४० वर्षांपासून दोन्ही धर्मियांमध्ये वाद असून न्यायालयात यावरून खटलाही चालू आहे.