रामनाथी (गोवा), १९ ऑक्टोबर (वार्ता.) – मूळ ठाणे येथील असणार्या आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. प्रमिला रामदास केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे १८ ऑक्टोबर २०२१ या रात्री १०.३० वाजता निधन झाले. १९ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक अधिवक्ता रामदास केसरकर यांच्या त्या पत्नी होत.
सौ. केसरकर यांनी प्रारंभीच्या काळात ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहर म्हणून सेवा केली. त्यानंतर त्यांनी काही काळ लेखाची सेवाही केली होती. रामनाथी येथील सनातन आश्रमात वास्तव्य करत असतांना त्यांनी ग्रंथ विभागात संकलनाची सेवाही केली होती. सौ. प्रमिला केसरकर यांच्या पश्चात पती, २ मुली, १ जावई आणि नात असा परिवार आहे. गेल्या ६ वर्षांपासून सौ. प्रमिला केसरकर या ‘पांढर्या पेशींपैकी एका प्रकारच्या पेशीच्या कर्करोगाने (‘मल्टीपल मायलोमा’ने) रुग्णाईत होत्या.
‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’ ही भजनपंक्ती आचरणात आणलेल्या सौ. प्रमिला केसरकर !‘साधारणतः २७ वर्षांपूर्वी मी मुंबई येथे घेत असलेल्या अभ्यासवर्गांच्या माध्यमातून अधिवक्ता रामदास केसरकर आणि सौ. प्रमिला केसरकर यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाला आणि त्यांना जीवनातील साधनेचे महत्त्व समजले. त्यानंतर उभयतांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. साधारणतः ६ वर्षांपूर्वी केसरकरकाकूंना कर्करोग झाल्याचे निदान झाले. सौ. प्रमिला केसरकर यांनी या असाध्य व्याधीशी झुंजत, तसेच सहनशीलता, सातत्य आणि चिकाटी या गुणांच्या आधारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘परिस्थिती स्वीकारली की, आपल्याला आनंद मिळतो’, ही साधनेतील शिकवण त्यांनी आचरणात आणली होती. आजारपणाच्या शेवटच्या टप्प्यात असतांना त्यांनी माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांची ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’, ही भजनपंक्ती आचरणात आणली होती. त्यामुळे कठीण शारीरिक स्थितीतही सौ. केसरकर आनंदी असायच्या. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा नामजपही चालू होता. सौ. प्रमिला केसरकर यांचा मृत्यूत्तर साधनेचा प्रवास जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.१०.२०२१) |