मुंबई – सुप्रसिद्ध हरहुन्नरी अभिनेते आणि उमदे व्यक्तिमत्त्व असलेले अतुल परचुरे यांचे ५७ व्या वर्षी निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता. त्यातून ते बरे झाले होते. कथ्थक नृत्य कलाकार आणि नृत्यशिक्षिका सोनिया परचुरे यांचे ते पती होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक कन्या आहे.
‘गेला माधव कुणीकडे ?’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘टिळक आणि आगरकर’ ही त्यांची नाटके बरीच गाजली. ‘जागो मोहन प्यारे’ ही त्यांची मालिकाही बरीच गाजली होती.
मराठी नाट्यसृष्टी गाजवलेले एक महत्त्वाचे कलाकार, त्याचसमवेत चित्रपट आणि मालिका यांमुळे प्रसिद्ध झालेले अतुल परचुरे हे एक व्यक्ती म्हणून सर्वांचे आवडते होते. परखडपणा जपणारे, सर्वांना हसवणारे, रसिकांना कायम आनंद देणारे असे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे वाचन अफाट होते. ‘अतिशय उत्तम माणूस’ असे अनेकांनी त्यांचे वर्णन केले आहे.