कोजागरी पौर्णिमा

‘आश्विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’, असे म्हणतात. मंगळवार, १९.१०.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.०४ नंतर ‘कोजागरी पौर्णिमा’ चालू होते.

१. आश्विन पौर्णिमेच्या विविध नावांचा अर्थ 

आश्विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’, ‘नवान्न पौर्णिमा’ किंवा ‘शरद पौर्णिमा’ या नावांनी ओळखले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होते, त्या दिवशी ‘नवान्न पौर्णिमा’ साजरी केली जाते.

अ. आश्विन पौर्णिमेला उत्तररात्री लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति ?’ म्हणजे ‘कोण जागत आहे ?’, असे विचारते; म्हणून या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’, असे म्हणतात.

आ. आश्विन पौर्णिमेला शेतकरी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवीन धान्याची पूजा करून त्यांचा नैवेद्य दाखवतात; म्हणून या पौर्णिमेला ‘नवान्न पौर्णिमा’, असे म्हणतात.

इ. आश्विन पौर्णिमा शरदऋतूत येते; म्हणून या पौर्णिमेला ‘शरद पौर्णिमा’, असे म्हणतात.

२. पौर्णिमा तिथी दोन दिवस असल्यास कोणत्या दिवशी कोजागरी पौर्णिमा साजरी करावी ?

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयसमयी असणारी तिथी ग्राह्य धरली जाते. हिंदु पंचांगानुसार आश्विन मासात मध्यरात्री असणार्‍या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी १९.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ७.०४ वाजल्यापासून २०.१०.२०२० या रात्री ८.२७ वाजेपर्यंत पौर्णिमा तिथी आहे. १९.१०.२०२० या दिवशी मध्यरात्री पौर्णिमा असल्याने त्या दिवशी कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

३. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पहाण्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

कोजागरीच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि इंद्रदेवता यांचे पूजन करतात. त्यामुळे लक्ष्मीकृपेने सुखसमृद्धी प्राप्त होते, तसेच या दिवशी चंद्राकडे पाहून त्राटक केल्याने नेत्रतेज वाढते. रात्री सोमदेवता (चंद्रदेवता), देवी लक्ष्मी यांना दुध किंवा खीर यांचा नैवेद्य दाखवून त्यात चंद्राचे दर्शन घेऊन वैद्यराज अश्विनीकुमार देवतेला प्रार्थना केल्यास चंद्राच्या किरणांच्या माध्यमातून अमृतप्राप्ती होते. याचे कारण ‘आश्विन पौर्णिमा’ अश्विनी नक्षत्रात चंद्र असतांना होते. अश्विनी नक्षत्राची देवता ‘अश्विनीकुमार’ आहे. अश्विनीकुमार सर्व देवतांचे चिकित्सक (वैद्य) आहेत. अश्विनीकुमारांच्या आराधनेमुळे असाध्य रोग बरे होतात. त्यामुळे वर्षातील इतर पौर्णिमांच्या तुलनेत आश्विन पौर्णिमेला चंद्रदर्शनाने त्रास होत नाही.

ज्योतिषशास्त्रात चंद्र ग्रहाला मनाचा कारक मानले आहे. त्यामुळे आपल्या मानसिक भावना, निराशा आणि उत्साह हे चंद्राशी संबंधित आहेत. यामुळे ज्यांच्या जन्मकुंडलीत चंद्रबळ न्यून असते, त्यांना पौर्णिमेच्या जवळपास मानसिक त्रास होण्याचे प्रमाण वाढते. ज्यांच्या जन्मकुंडलीत चंद्रबळ चांगले आहे, त्यांची पौर्णिमेचा चंद्र, चांदण्या, अशा वातावरणात प्रतिभा जागृत होते. त्यांना काव्य सुचते.

४. कोजागरी पौर्णिमेला ज्येष्ठ अपत्याला ओवाळण्याचे महत्त्व

चंद्र हा ग्रह मातृकारक आहे, म्हणजे कुंडलीतील चंद्रावरून मातेचे सुख अभ्यासतात. आश्विन पौर्णिमेला चंद्राच्या साक्षीने माता आपल्या ज्येष्ठ अपत्याला कृतज्ञताभावाने ओवाळते; कारण प्रथम अपत्याच्या जन्मानंतर स्त्रीला मातृत्वाचा आनंद प्राप्त होतो.

५. कोजागरी पौर्णिमेला चंद्राची उपासना केल्याने होणारे लाभ

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती-ओहोटी येते. पौर्णिमा आणि अमावास्या तिथीला समुद्राला येणारी भरती-ओहोटी अधिक जाणवते; कारण चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीसह सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती असते. असाच परिणाम पृथ्वीवरील द्रव स्वरूपात असणार्‍या प्रत्येक घटकावर होतो. मानवी शरिरातील जलीय अंश, सप्तधातू आणि सप्तरंग यांच्यावरसुद्धा चंद्राचा प्रभाव पडतो. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असल्याने चंद्राचा मानवी शरीर आणि मन यांवर अधिक प्रभाव होतो. यासाठी या दिवशी चंद्राचा पुढीलपैकी एक जप केल्याने लाभ होतो.

अ. चंद्रदेवतेचा ‘ॐ चन्द्राय नमः ।’ हा जप करावा.

आ. नवग्रह स्तोत्रातील चंद्र ग्रहाचा जप म्हणावा. त्याची जपसंख्या ११ सहस्र आहे.

दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवम् ।
नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम् ।।
– नवग्रहस्तोत्र, श्लोक २

अर्थ : दही, शंख आणि पाण्याच्या तुषारांप्रमाणे शुभ्र अशा, क्षीरसमुद्रातून उत्पन्न झालेल्या, भगवान शंकराच्या मुकुटावरचे भूषण असलेल्या चंद्राला मी वंदन करतो.’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.१०.२०२१)