यवत (पुणे) येथे प्रसुतीच्या वेळी महिलेला मारहाण !

घडलेली घटना अपघाताने घडल्याचे आधुनिक वैद्यांचे स्पष्टीकरण

यवत (जिल्हा पुणे) – बाळंतपणासाठी येथील ‘जयवंत हॉस्पिटल’मध्ये भरती केलेल्या पूजा दळवी या गरोदर महिलेला तिच्यावर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांनी प्रसुतीच्या वेळी तोंड, हात, डोके, मांडी, ओठ यांवर मारहाण केली. याविषयी ३ दिवसांनी महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर १८ ऑक्टोबरच्या रात्री संबंधित आधुनिक वैद्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मारहाण झालेल्या महिलेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खामगाव मधील अनुमाने २०० ते ३०० लोकांनी रुग्णालयासमोर गर्दी केली होती. ‘जयवंत हॉस्पिटल’चे डॉ. चैतन्य भट यांनी सांगितले की, संबंधित महिलेची प्रसुती नैसर्गिकरित्या होणे हे काहीसे अडचणीचे होते. प्रयत्न करत असतांना महिलेच्या वाढत्या हालचालींमुळे व्यत्यय येत होता. महिलेला आवरत असतांना मी घसरून पडलो. या वेळी माझ्या हाताचा कोपरा तिच्या डोळ्याजवळ लागला. महिलेची प्रसूती नैसर्गिक आणि सुखरूप झालेली आहे. ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. घडलेली घटना अपघाताने घडली आहे.