२ महिलांची आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णालयांबाहेर प्रसुती ! 

  • वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या निलंबनाची सूचना

  • बुलढाणा जिल्ह्यातील २ रुग्णालयांतील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार !

रुग्णालयाबाहेर २ महिलांची प्रसुती होणे, हे आरोग्य विभागाला लज्जास्पद आहे. सरकारने कोट्यवधी रुपये व्यय करून आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये उभी केली असूनही आरोग्य कर्मचार्‍यांकडून मात्र कामचुकारपणा होत आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड होते. वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि आरोग्यमंत्री यांनी यात लक्ष घालून रुग्णांच्या समस्या सोडवाव्यात, अशी रुग्णांची अपेक्षा आहे. – संपादक 

बुलढाणा – जिल्ह्यातील संग्रामपूर आणि वरवट बकाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत आलेल्या २ गर्भवती महिलांची प्रसुती रुग्णालयाबाहेरच झाली. दोन्ही रुग्णालयांत एकही आधुनिक वैद्य आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याने ही घटना घडली. एका महिलेची रिक्शामध्ये, तर दुसर्‍या महिलेची आरोग्य केंद्राच्या बाजूच्या एका घरात प्रसुती करण्यात आली. त्यामुळे  गावातील नागरिक संतप्त आहेत. या दोन्ही घटनांची जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी गंभीर नोंद घेऊन रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांना निलंबित करण्याची सूचना जिल्ह्याच्या आरोग्य अधिकार्‍यांकडे केली आहे.

शासनाने तालुक्यातील संग्रामपूरसह सोनाळा, वानखेड, पातुर्डा या ४ गावांत प्राथमिक आरोग्य केंद्र, तर वरवट बकाल येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली आहे; पण गेल्या अनेक वर्षांपासून येथे आरोग्य कर्मचार्‍यांची ३५ पदे रिक्त आहेत.

अनुपस्थित असणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांवर कारवाई करू !

याविषयी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद रोजतकर म्हणाले की, या प्रकरणी कर्तव्यात कसूर करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. संग्रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी वेळेवर आले नाहीत, अशी दूरभाषवरून माझ्याकडे तक्रार आली असून कामचुकार आणि कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.