पुणे येथे १४ वर्षीय मुलीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या !

  • कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यामुळे समाजात गुन्ह्यांमध्ये वाढ ! – संपादक
  • महिलांसमवेत अल्पवयीन मुली असुरक्षित असणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी अशोभनीय ! कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण करण्यासमवेत समाजाला धर्मशिक्षण देऊन समाजाची सात्त्विकता आणि नीतीमत्ता वाढवणे आवश्यक आहे ! – संपादक
  • स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आदिशक्तीचा जागर होणे आवश्यक ! – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – शहरातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘यश लॉन्स’ परिसरात आठवीमध्ये शिकणार्‍या क्षितिजा व्यवहारे या १४ वर्षीय मुलीची १२ ऑक्टोबर या दिवशी कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. कबड्डीपटू असलेली क्षितिजा स्वत:च्या मैत्रीणींसमवेत कबड्डीचा सराव करीत असतांनाच ही घटना घडली आहे. गंभीररित्या घायाळ झालेल्या क्षितिजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा केला. त्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणलेले अन्य शस्त्र टाकून पळ काढला. या प्रकरणी ५ जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून २ अल्पवयीन आरोपींना पकडण्यात आले आहे, तर २२ वर्षीय शुभम भागवत हा मुख्य आरोपी अद्याप पसार आहे.

शुभम भागवत हा मुलीचा दूरचा नातेवाईक आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपीजवळ पिस्तूलही असल्याची माहिती समोर येत आहे; परंतु गुन्हा करत असतांना त्याला ते काढता आले नाही.

अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार करून हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अजित पवार

पुणे – क्षितिजा व्यवहारे हिची कोयत्याने वार करून हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळतांना अशी निर्घृण हत्या होणे, हे सामाजिक अध:पतनाचे गंभीर लक्षण आहे. अल्पवयीन मुलीवर एवढ्या अमानुषपणे वार करणारी व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचे कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.