राज्यांनी त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध असलेल्या अतिरिक्त विजेची माहिती द्यावी ! – केंद्र सरकारची सूचना

वीजनिर्मितीसाठीच्या कोळशाच्या पुरवठ्याचे संकट

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – कोळसा टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने केंद्रीय वीज निर्मिती केंद्रांवरून पुरवण्यात येणार्‍या विजेच्या वापराविषयी नियमावली घोषित केली आहे. ‘राज्यांना दिली जाणारी वीज त्यांनी ग्राहकांसाठी वापरावी’, अशी सूचना देण्यात आली आहे. ‘ज्या राज्यांकडे अतिरिक्त वीज उपलब्ध आहे, त्यांनी याविषयीची माहिती द्यावी, जेणेकरून त्या विजेचा वापर आवश्यक असणार्‍या राज्यांसाठी करता येईल’, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. विजेच्या संकटाचा धोका केवळ भारत नव्हे, तर अमेरिका, चीन आणि युरोप येथेही निर्माण झाला आहे.

‘केंद्रीय वीज प्राधिकरणा’च्या (‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी’च्या) ७ ऑक्टोबरच्या अहवालानुसार, देशात १३५ पैकी ११० विद्युत प्रकल्पांत कोळशाचा साठा अल्प झाल्याने संकट निर्माण झाले आहे. १६ प्रकल्पांत तर एक दिवसाचा कोळशाचा साठाही शिल्लक नाही. ३० प्रकल्पांकडे १ दिवसाचा कोळसा साठा आहे, तर १८ प्रकल्पांत केवळ २ दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे.