हिंदु धर्माचा अभ्यास करून चुकीच्या आक्षेपांचे खंडण करा ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

दादर (मुंबई) येथे ‘संस्कार भारती’च्या वतीने ‘धर्म’ विषयावर ऑनलाईन आयोजित व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

वैद्य उदय धुरी

मुंबई – मागील काही वर्षांपासून हिंदु धर्म आणि आपला इतिहास यांविषयी सतत अपसमज पसरवले जात आहेत. आपल्या धर्मग्रंथांची उपेक्षा केली जात आहे. असेच चालू राहिले, तर आपले अस्तित्व टिकवता येणार नाही. आपल्या धर्मावरील चुकीचे आक्षेप खपवून घेऊ नका. धर्माचा अभ्यास आणि साधना करून धर्मावरील चुकीच्या आक्षेपांचे खंडण करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी केले. ‘संस्कार भारती’च्या दादर शाखेच्या वतीने ‘धर्म म्हणजे काय ? हिंदु धर्माविषयी अपसमज, टीका आणि त्यांचे निराकरण’ या विषयांवर ऑनलाईन प्रणालीद्वारे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला ‘संस्कार भारती’च्या सदस्यांसह उपस्थित धर्मप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभला. सनातन संस्थेच्या वतीने सौ. शर्मिला बांगर यांनी सनातनच्या ग्रंथांच्या प्रसाराविषयी चालू असलेल्या ज्ञानशक्ति प्रसार अभियानाविषयी उपस्थितांना माहिती दिली.

या व्याख्यानाचा प्रारंभ संस्कार भारतीच्या दादर शाखेच्या अध्यक्षा सौ. रंजना जोगळेकर यांनी नटराजपूजन आणि दीपप्रज्वलन केले. त्यानंतर ध्येय गीत म्हणण्यात आले. संस्कार भारतीच्या दादर शाखेचे सचिव श्री. मधुकर आगाशे यांनी संस्कार भारतीच्या कार्याचा परिचय करून दिला. संस्कार भारतीच्या दादर शाखेचे अध्यक्ष श्री. शशी लिमये यांनी व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट करत सनातन संस्थेच्या कार्याचाही परिचय करून दिला.  व्याख्यानाच्या शेवटी शंकानिरसन झाले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

या वेळी व्याख्यानात मार्गदर्शन करतांना वैद्य धुरी म्हणाले, ‘‘मानवाच्या सर्वांगीण उन्नतीकरता ईश्वराने हिंदु धर्माची निर्मिती केली. ‘जगात हिंदु धर्म वगळता अन्य सर्व पंथ आहेत’, हे लक्षात घेतले पाहिजे. इंग्रजी भाषेत धर्माला योग्य शब्द नाही. त्यामुळे धर्माला ‘रिलीजन’ असे संबोधले जात आहे. ‘रिलिजन (Religion)’ हा शब्द ‘रेलिगेट्’ (Relegate)’ या क्रियापदावरून बनला आहे. ‘रेलिगेट्’ म्हणजे ‘खालच्या पायरीला पाठवणे’. याउलट धर्मानुसार आचरण केल्याने आपली उन्नती होते; म्हणजे आपण उच्च  पातळीला जातो. त्यामुळे हिंदु धर्माला ‘रिलिजन’ च्या चौकटीत बसवू नका.

अभिप्राय

१. श्री. श्रीकांत मराठे, अध्यक्ष, संस्कार भारती, मुंबई : हे उद्बोधन मोलाचे आणि आवश्यक असे आहे. असा कार्यक्रम केल्याविषयी संस्कार भारतीच्या दादर शाखेच्या कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद !

२. सौ. रंजना जोगळेकर, अध्यक्षा, संस्कार भारती, दादर शाखा : या व्याख्यानातून पुष्कळ गोष्टी नव्याने कळल्या. श्री. शशी लिमये यांच्या प्रयत्नातून एक चांगला कार्यक्रम आपण करू शकलो.

३. श्री. शशी लिमये, उपाध्यक्ष, संस्कार भारती, दादर शाखा : संस्कार भारतीच्या दादर शाखेच्या वतीने प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. हा एक वेगळा अनुभव होता.

४. श्री. मधुकर आगाशे, सचिव, संस्कार भारती, दादर शाखा : धर्माविषयी अनेक प्रश्नांची उकल करून डोळ्यांत अंजन घालण्याचे काम या व्याख्यातून झाले. अशा योग्य गोष्टी सांगणे, ही काळाची आवश्यकता आहे.

क्षणचित्रे

१. व्याख्यान ऐकल्यावर काही उपस्थित मान्यवरांनी सनातनच्या ग्रंथांची मागणी केली

२. कार्यक्रमाच्या वेळी वक्त्यांना ३ वेळा इंटरनेटची अडचण आली. अशा वेळी संयम ठेवून उपस्थितांनी सहकार्य करून कार्यक्रमात खंड पडू दिला नाही.