अपहाराचा ठपका असलेल्या वाहकाचे त्याच आगारात पुन्हा स्थानांतर नाही !

विभाग नियंत्रक कार्यालयांना एस्.टी. महामंडळाचे आदेश !

अपहार करणार्‍या वाहकांचे इतरत्र स्थानांतर केल्यानंतर त्यांच्या वृत्तीत चांगला फरक पडेल, याची शाश्वती नसते. त्यामुळे अशा भ्रष्ट वाहकांना कायमस्वरूपी बडतर्फ केले पाहिजे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. – संपादक 

नागपूर – अपहार प्रकरणात स्थानांतर (बदली) होऊन ३ वर्षे पूर्ण केलेल्या वाहकाचे ज्या आगारातून स्थानांतर केले आहे, तेथेच पुन्हा विनंती स्थानांतराला प्रतिबंध घालण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस्.टी.) याविषयीचे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रक कार्यालयात नुकतेच पाठवले आहेत. या निर्णयाला काही ‘एस्.टी.’च्या संघटनांनी विरोध केला आहे, त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अपहार करणार्‍या वाहकाचे प्रदेशांतर्गत वा प्रदेशाबाहेर स्थानांतर केले जाते. त्यानंतर या कर्मचार्‍यांच्या विनंती स्थानांतराविषयी काय करावे, हा प्रश्न उपस्थित झाला होता. शेवटी एस्.टी. महामंडळाने तृतीय आणि चतुर्थ अन् त्यानंतरच्या अपहार प्रकरणी प्रदेशांतर्गत, तसेच प्रदेशाबाहेर स्थानांतर केलेल्या वाहकांविषयी नुकताच एक आदेश काढला आहे. त्यानुसार ३ वर्षे पूर्ण केलेल्या वाहकांनी मूळ विभागामध्ये स्थानांतरासाठी विनंती अर्ज केला, तर तेथील रिक्त पदाच्या उपलब्धतेनुसार त्यांचे स्थानांतर होईल; परंतु ज्या आगारातून दोषी ठरलेल्या वाहकाचे प्रशासकीय स्थानांतर झाले, त्या आगारात त्यांना पुन्हा सेवेची संधी मिळणार नाही. विभागातील इतर आगारातच त्यांचे स्थानांतर होईल.