पेट्रोलच्या अवैध विक्री व्यवसायाविरोधात बातमी दिल्याच्या रागातून पुणे येथील पत्रकाराची हत्या करणार्‍यास ५ वर्षांची शिक्षा !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे, १० ऑक्टोबर – पेट्रोलच्या अवैध विक्री व्यवसायाविरोधात बातमी दिल्याच्या रागातून प्रदीप थुंबे या पत्रकाराची हत्या केल्याप्रकरणी तसेच त्याच्या भावाला आणि आईला मारहाण केल्याप्रकरणी व्यंकटेश मुदलीयार या गॅरेज चालकाला ५ वर्षांची शिक्षा आणि ३ सहस्र रुपयांचा दंड न्यायालयाने सुनावला आहे. सत्र न्यायाधीश जी.पी. अगरवाल यांनी हा आदेश दिला. आरोपीने मृत पत्रकाराच्या घायाळ भावाला ३० सहस्र रुपये हानीभरपाई द्यावी, असेही निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणातील सहआरोपी साईनाथ मुदलीयार याचा मृत्यू झाला आहे, तर अन्य ४ सहआरोपींची न्यायालयाने १६ सप्टेंबर २०१७ या दिवशी निर्दोष मुक्तता केली. प्रदीप थुंबे हे पत्रकार आणि ‘जागरूक नागरिक संघटने’चे अध्यक्ष होते. त्यांनी साईनाथ मुदलीयार याच्या पेट्रोलच्या अवैध विक्री व्यवसायाविरोधात पोलीस, महापालिका आणि पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या; तसेच बातम्या दिल्या होत्या. संबंधित अधिकार्‍यांनी कारवाई केल्यामुळे साईनाथचा तक्रारदारांवर राग होता.