पुराव्याअभावी ६ जणांना सोडले ! – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक

‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील पार्टीवर धाड टाकल्याचे प्रकरण

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह

मुंबई – क्रूझवरील कारवाईनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ११ नव्हे, तर १४ जणांना अटक करण्यात आली; मात्र पुराव्याअभावी ६ जणांना सोडण्यात आले, अशी माहिती केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी ९ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे उपस्थित होते. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे ज्यांना सोडले त्यांची नावे देता येणार नाहीत, असे या वेळी सिंह यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी ‘क्रूझ’ वरील कारवाईनंतर भाजपच्या दबावामुळे ३ जणांना सोडण्यात आले, असा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यावर अमली पदार्थविरोधी पथकाकडून उत्तर देण्यात आले. या वेळी ज्ञानेश्वर सिंह म्हणाले, ‘‘अटक करण्यात आलेल्यांपैकी आम्ही यापूर्वी कुणालाही ओळखत नव्हतो. आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.’’