चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चा कोकणसह संपूर्ण महाराष्ट्राला लाभ होणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांशी चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाविषयी, तसेच त्यातील अडचणी सोडविण्याविषयी ७ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची ‘दूरदृश्य प्रणाली’द्वारे बैठक झाली. या वेळी बोलतांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळ’ चालू झाल्यानंतर केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच नव्हे, तर संपूर्ण कोकणसह महाराष्ट्र राज्याला याचा लाभ होणार आहे’, असे सांगितले. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री सिंधिया यांना महाराष्ट्र राज्याला भेट देण्याचे निमंत्रण दिले.

या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विशेषतः नांदेड, कोल्हापूर, औरंगाबाद येथील विमानतळांवर अधिक क्षमतेने विमान वाहतूक सेवा करण्याविषयी, तसेच काही तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्याची विनंती केंद्रीय मंत्री सिंधिया यांना केली. राज्यातील नागपूर, जळगाव, अकोला, सोलापूर, गोंदिया, जुहू, अमरावती येथील विमान वाहतूक आणि दळणवळण वाढवण्याविषयी राज्यशासन आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांच्यात अधिक समन्वय वाढवणे, तसेच कालबद्ध रितीने काम करावे, यावर चर्चा झाली.

सिंधुदुर्ग विमानतळावर विमान उड्डाणाची चाचणी यशस्वी

विमानतळाचे उद्या उद्घाटन

सिंधुदुर्ग विमानतळावर चाचणीसाठी  उतरवण्यात आलेले विमान

कुडाळ – वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चे ९ ऑक्टोबर या दिवशी उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ६ ऑक्टोबरला ‘अलायन्स एअर’ या आस्थापनाने ‘गोवा ते सिंधुदुर्ग विमानतळ’ अशी विमान उड्डाणाची (टेस्ट लँडिंग) चाचणी केली. हा विमानतळ २० वर्षांनंतर पूर्णत्वास आला असून त्याच्या उद्घाटनाकडे आता सिंधुदुर्गवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘अलायन्स एअर’चे विमान गोवा येथून निघून २४ मिनिटांत सिंधुदुर्ग विमानतळावर पोचले आणि १ घंट्याने पुन्हा चिपी विमानतळावरून गोव्यासाठी उड्डाण केले. या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वर्ष २०१८ मध्ये केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला येथे श्री गणेशाची मूर्ती घेऊन विमान उतरवले होते; मात्र त्या वेळी विमानतळाचे काम अपूर्ण असल्याने केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने विमानतळ वापरण्यास अनुमती दिली नव्हती. आता विमानतळाचे काम पूर्ण होऊन आवश्यक त्या अनुमती मिळाल्याने विमानतळ सेवेसाठी सिद्ध झाले आहे.