कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील बस देवचंद महाविद्यालय परिसरात न सोडल्यास कर्नाटकातून येणारी वाहने कागलमधून सोडणार नाही ! – संभाजीराव भोकरे, शिवसेना

प्रतीकात्मक छायाचित्र

कागल (जिल्हा कोल्हापूर), ७ ऑक्टोबर (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील हमीदवाडा, मुरगुड, चिखली, कौलगे, गलगले या गावांमधील विद्यार्थी कर्नाटकातील देवचंद महाविद्यालय येथे शिक्षणासाठी बसमधून मोठ्या प्रमाणात जातात; पण काही दिवसांपासून कर्नाटक राज्याचे पोलीस निंगनूर नाका येथे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या बसला देवचंद महाविद्यालय परिसरात प्रवेश देत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना ५ किलोमीटर चालत जावे लागते. त्यामुळे यापुढील काळात कर्नाटक पोलिसांनी विद्यार्थ्यांची बस देवचंद महाविद्यालय परिसरात न सोडल्यास कर्नाटक राज्यातून येणारी वाहने कागलमधून सोडण्यात येणार नाहीत, तसेच सीमा नाक्यावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी दिली आहे. या मागणीचे निवेदन संभाजीराव भोकरे यांच्या पुढाकाराने पोलीस निरीक्षक संजय गोर्ली यांना देण्यात आले.

पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कागल तालुका हा कर्नाटक राज्याला लागून असल्यामुळे व्यापार आणि उद्योगधंदे अशांसाठी दोन्ही राज्यांतील व्यापारी ये-जा करतात. कर्नाटकचे काही पोलीस अधिकारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून काही गाड्यांना सोडत नाहीत. प्रवासी वाहतूक करणार्‍या अन्य गाड्या आणि अवैध वाहतूक करणार्‍या गाड्या यांची मात्र अडवणूक केली जात नाही. यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात कर्नाटक पोलिसांविषयी प्रचंड रोष आहे. तरी याची त्वरित नोंद घ्यावी. या वेळी सर्वश्री समीर देसाई, मल्हार कुलकर्णी, प्रभाकर थोरात, राजू साळोखे, किरण कुलकर्णी, राहुल टिकले, वैभव आडके यांसह अन्य उपस्थित होते.