माहीम (मुंबई) येथील काशी विश्वेश्वर मंदिरातील पुरातन मूर्ती गायब झाल्याच्या प्रकरणी भाविकांकडून सहपोलीस आयुक्तांकडे तक्रार !

माहीम पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍यांना बोलावून प्रकरणाची माहिती घेण्याचे पोलीस उपआयुक्तांचे आश्वासन !

काशी विश्वेश्वर मंदिर, माहीम

मुंबई, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – माहीम येथील २३६ वर्षे पुरातन असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरातील मूर्ती गायब झाल्याच्या प्रकरणी ७ ऑक्टोबर या दिवशी भाविक श्री. प्रसाद ठाकूर, तसेच मनसेचे माहीम विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांनी पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे (गुन्हे अन्वेषण विभाग) आणि पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेतली. या प्रकरणी विश्वास नांगरे-पाटील यांनी ८ ऑक्टोबर या दिवशी माहीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांना बोलावून या प्रकरणाची माहिती घेऊन गुन्हा नोंदवण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे. श्री. यशवंत किल्लेकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे (डावीकडे) यांना निवेदन देतांना यशवंत किल्लेदार

भाविकांकडून माहीम पोलीस ठाण्यात तक्रार करूनही, तसेच धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणी विश्वस्तांविषयी गंभीर सूत्रे नोंदवूनही अद्याप पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. या प्रकरणी श्री. यशवंत किल्लेदार पोलीस आयुक्तांकडे, तर श्री. प्रसाद ठाकूर यांनी माहीम पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे; मात्र त्यानंतरही गुन्हा नोंदवण्यात न आल्याने भाविकांनी पोलीस उपआयुक्तांची भेट घेतली.

…तर आक्रमकपणे आंदोलन करावे लागेल ! – यशवंत किल्लेदार, उपाध्यक्ष, विधानसभाक्षेत्र, माहीम, मनसे

गुन्हा न नोंदवण्यात होणारी दिरंगाई जाणीवपूर्वक होत आहे कि विश्वस्तांना पाठीशी घालण्यासाठी होत आहे ? याची चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही पोलीस उपआयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणी आम्हाला १-२ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यास गायब झालेल्या मूर्ती सापडतील, अशी अपेक्षा आहे. पोलिसांकडून कारवाई झाली नाही, तर मंदिराच्या बाहेर आम्हाला आक्रमकपणे आंदोलन करावे लागेल.

विश्वस्तांवर गुन्हा नोंदवण्याची यशवंत किल्लेदार यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी !

मंदिराच्या ‘दादोबा रिलीजस ट्रस्ट’ या संस्थेच्या विश्वस्तांची भूमिका संशयास्पद आहे. ही घटना हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. त्यामुळे या प्रकरणी मंदिराच्या विश्वस्तांवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी मनसेचे माहीम विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याविषयीचे निवेदन श्री. किल्लेदार यांनी सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिले.