१५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणीच्या नूतनीकरणाच्या शुल्कामध्ये एप्रिल २०२२ पासून ८ पट वाढ

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – एप्रिल २०२२ पासून १५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणीच्या नूतनीकरणाच्या शुल्कामध्ये ८ पट वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक वाहने चालवण्यास योग्य असल्याच्या प्रमाणपत्रासाठीही ८ पट अधिक शुल्क भरावे लागणार आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याविषयीची अधिसूचना काढली आहे.

१५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या चारचाकी वाहनांच्या नोंदणीच्या नूतनीकरणासाठी सध्या केवळ ६०० रुपये शुल्क आकारले जाते. अधिसूचनेनुसार ते पुढील वर्षी ५ सहस्र रुपये असेल. जुन्या दुचाकी वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरणशुल्क ३०० रुपयांवरून १ सहस्र रुपये असेल. बस अथवा ट्रक चालवण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठीचे शुल्क १ सहस्र ५०० रुपयांवरून १२ सहस्र ५०० रुपये इतके करण्यात आले आहे. १५ वर्षांनंतर वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण पुढील प्रत्येक ५ वर्षांनी करावे लागणार आहे. नूतनीकरण करायला विलंब झाल्यास प्रत्येक मासासाठी ३०० रुपये विलंब शुल्क भरावा लागणार आहे. व्यावसायिक वाहनांसाठीचे विलंब शुल्क प्रति मास ५०० रुपये असेल.