सिंहगड रस्त्यावरील (पुणे) ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्या वर्षीचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !

शाळा प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याची युवा सेनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी !

इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा मुजोरपणा अल्प करण्यासाठी अशा शाळा प्रशासनावर तत्परतेने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक 

सिंहगड रस्ता, हिंगणे येथील ज्ञानगंगा शाळा 

पुणे – गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या आहेत; मात्र शैक्षणिक शुल्कासंदर्भात योग्य नियमावली नसल्याने विद्यार्थी आणि पालक यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी अडचणीचा सामना करावा लागला. सिंहगड रस्ता, हिंगणे येथील ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मागील वर्षाचे शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. त्यांच्या पालकांना बोलावून उर्वरित शुल्क भरण्याविषयी सांगण्यात आले. शुल्काच्या रकमेचे पुढील दिनांकाचे धनादेश द्यावेत किंवा शुल्क कधीपर्यंत भरणार याविषयी लेखी पत्र द्यावे, असे आवाहन शाळेचे संस्थापक संभाजी काटकर यांनी पालकांना केले. शाळा प्रशासनाच्या या मनमानीमुळे या शाळेवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेचे कल्पेश यादव यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे, तसेच पालकांच्या विविध अडचणी शिक्षण विभागापर्यंत पोचण्यासाठी एक विशेष (हेल्पलाईन) साहाय्य क्रमांक चालू करावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.