राज्यातील शाळा पुन्हा चालू होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद !
मुंबई – मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा पुन्हा उघडत आहोत; पण आता चालू झालेल्या शाळा पुन्हा बंद करायच्या नाहीत, अशा निर्धाराने शिक्षण चालू ठेवू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी, तर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत वर्ग चालू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी ‘ऑनलाईन’ संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘शाळा चालू करून आपण मुलांच्या प्रगतीचे दार उघडत आहोत; मात्र मुलांची अधिक काळजी घेणे, हे आपले दायित्व आहे. आज मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेत. सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची. नवीन वह्या-पुस्तके आणि गणवेश मिळायचे. आताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा सर्वांत आव्हानात्मक काळ चालू आहे. शाळा चालू करतांना वर्गखोल्यांची दारे बंद नसावीत. हवा खेळती असावी. शाळेचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निर्जंतुकीकरण करताना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही, याची काळजी घ्यावी. स्वत:च्या पाल्याचे दायित्व स्वतः घ्या. पाऊस किंवा अन्य साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. शिक्षकांना बरे वाटत नसेल किंवा शंका आल्यास त्वरित कोरोनाची चाचणी करून घ्यावी.’’