अंधेरी (मुंबई) येथील वाहनचालकाचा उद्दामपणा !
मुंबई – अंधेरी (पश्चिम) येथील आझादनगर मेट्रो स्थानकाच्या खाली प्रवेश निषिद्ध असलेल्या रस्त्यावर वाहन थांबवण्याच्या प्रयत्नात गाडीच्या ‘बोनेट’वर चढलेल्या वाहतूक पोलिसाला चालकाने तसेच फरफटत नेले. ३० सप्टेंबर या दिवशी ही गंभीर घटना घडली. डी.एन्.नगर वाहतूक विभागाचे पोलीस नाईक गुरव यांच्या संदर्भात हा प्रसंग घडला. चारचाकीच्या मालकाचे नाव सोहेल कटूरिया असे असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (वाहनचालकांना कायदा-सुव्यवस्था, तसेच पोलीस यांचा धाकच उरलेला नाही, हे यातून दिसून येते. असा उद्दामपणा करणार्यांना वेळीच कठोर शासन होत नसल्याने हे प्रकार अनेक ठिकाणी होतात. याला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने कठोर कारवाईचा अवलंब करणेच उचित ठरेल ! – संपादक)
या प्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी या प्रसंगाचे चित्रीकरण करून सामाजिक प्रसारमाध्यमांवर याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित केला. त्यानंतर घटनेची तीव्रता लक्षात आली. वाहनचालकाच्या उद्दामपणाविषयी समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस नाईक गुरव यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले; मात्र गाडी न थांबवल्यामुळे गुरव गाडीच्या ‘बोनेट’वर चढले. चालकाने त्या स्थितीतच गाडी चालवत पुढे गेली. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी गाडी थांबवली. नागरिकांनी अनेकदा सांगूनही चालक गाडीच्या बाहेर आला नाही. गाडीच्या काचा काळ्या रंगाच्या असल्यामुळे चालकाचे तोंड दिसले नाही. चालकाने पुन्हा गाडी चालू करून पोलिसाला बोनेटवरून खाली पाडले आणि तो पळून गेला. गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी जुहू गल्ली येथून ही गाडी कह्यात घेतली आहे.