देगलूर (नांदेड) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना पक्षप्रवेशापूर्वीच भाजपची उमेदवारी !

नांदेड – येथील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष पिराजी साबणे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ४ ऑक्टोबर या दिवशी त्यांची उमेदवारी अधिकृतरित्या घोषित केली आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे त्या रिक्त जागेवर ३० ऑक्टोबर या दिवशी ही पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नरसी येथे श्रावण पाटील यांच्या निवासस्थानी साबणे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार चिखलीकर यांच्यासह भाजपच्या मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत बंद खोलीत विशेष चर्चा झाली. त्यानंतर माजी आमदार साबणे यांच्या उमेदवारीवर केंद्रीय भाजप कार्यालयाकडून अधिकृत पत्रक काढून शिक्कामोर्तब झाले.