हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निवासी उपजिल्हाधिकार्यांकडे मागणी
भक्त आणि भाविक यांना देवतेचे दर्शन प्रशासनाने नि:शुल्कच उपलब्ध करावे ! – संपादक
नाशिक – जिल्ह्यातील श्री कालिकादेवी मंदिरात भक्तांना दर्शनासाठी ‘टोकन’ (बिल्ला) पद्धत बंधनकारक करण्यात आली असून त्यासाठी प्रत्येकी १०० रुपये आकारले जाणार आहेत. मंदिर प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत अयोग्य असून हिंदु जनजागृती समिती आणि जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी या निर्णयाचा निषेध करत मंदिरातील ‘टोकन’ पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे निःशुल्क दर्शन चालू करा, या मागणीचे निवेदन येथील निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना दिले.
या वेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष श्री. रामसिंग बावरी, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. गौरव जमधडे, विश्व हिंदू परिषदेचे श्री. कैलास देशमुख, सनातन संस्थेचे श्री. राहुल पाटील उपस्थित होते.
प्रत्येक वेळेस हिंदूंवरच अन्याय का ? मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे ! – रामसिंग बावरी, अध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन पक्ष
देवदर्शनासाठी ‘टोकन’ आकारणे हे देव आणि भक्त यांच्यात अडथळा आणल्यासारखेच आहे ! – गौरव जमधडे, जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
देव हा पैशांचा भुकेला नाही, तर भावाचा भुकेला असतो. त्याच्या दर्शनासाठी शुल्क आकारणे, हे अतिशय निंदनीय आहे. देवतेचे दर्शन हे निःशुल्कच असायला हवे. मंदिर प्रशासनाने ‘अर्पण निधीची अनुपलब्धता असल्याने दान करा’, असे केवळ आवाहन जरी केले असते, तरी ‘टोकन’ पद्धतीतून मिळणार्या पैशांपेक्षा कितीतरी अधिक दान भाविकांनी स्वखुशीने केले असते; मात्र भाविकांवर अशा प्रकारे ‘टोकन’ लादणे, हे देव आणि भक्त यांच्यात अडथळा आणल्यासारखेच आहे.