‘२० फेब्रुवारी २०१९ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे एकत्रित उभे असलेले छायाचित्र पाहिल्यानंतर मला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठिकाणी श्रीविष्णूचे दर्शन होणे, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या ठिकाणी सुदर्शन चक्र, तर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या ठिकाणी शंख आणि कमळ असल्याचे जाणवणे
हे छायाचित्र पहातांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठिकाणी श्रीविष्णूचे दर्शन झाले. ‘त्यांच्या उजव्या बाजूला असणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, म्हणजे श्रीविष्णूच्या हातातील सुदर्शनचक्र आहेत. त्यांच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, म्हणजे श्रीविष्णूच्या हातातील शंख आणि कमळ आहेत’, असे मला जाणवले. सुदर्शन चक्र, शंख आणि कमळ हे श्रीविष्णूशी पूर्णतः एकरूप झाले आहेत. त्याप्रमाणे या दोघी जणी परात्पर गुरु डॉक्टरांशी पूर्णतः एकरूप झाल्या आहेत.
त्यानंतर देवाने मला पुढील विचार दिले.
२. श्रीविष्णूच्या हातातील शंखस्वरूप असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आपत्काळापूर्वी सर्वांमध्ये साधनेविषयी जागृती करत असणे
आपत्काळाच्या पार्श्वभूमीवर श्रीविष्णूचे कार्य चालू आहे. श्रीविष्णूच्या हातातील शंखस्वरूप असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सध्या सर्वत्र भ्रमण करत आहेत. युद्धापूर्वी जसा शंखनाद केला जातो, त्याप्रमाणे त्या आपत्काळापूर्वी सर्वत्र जाऊन साधकवृत्ती असलेल्या सर्वांना जागृत करत आहेत. त्यांना साधनेत पुढच्या टप्प्याला नेत आहेत. ‘सर्वांना आपत्काळाला सामोरे जाता यावे’, यासाठी त्या सर्वांना श्रीविष्णूचे चैतन्य प्रदान करत आहेत. श्रीविष्णूच्या या शंखनादातून जे जागृत होतील, तेच पुढील काळात तरून जातील.
३. दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी श्रीविष्णूचे नारायणास्त्र, म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ कार्यरत असणे
यानंतर समाजात ज्या दुष्प्रवृत्ती रहातील, त्यांच्या निर्मूलनासाठी श्रीविष्णूचे नारायणास्त्र, म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सूक्ष्म कार्य असेल. भगवंताच्या या नारायणास्त्रापुढे कुणाचाही निभाव लागणार नाही. जे शरण येतील, म्हणजे साधना करतील तेच टिकतील. समाजातील सर्व दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करण्याचे कार्य श्रीविष्णूचे हे नारायणास्त्र करेल.
४. महायुद्धातील विनाशानंतर, म्हणजेच चिखलात कमळरूपी साधक फुलवण्याचे कार्य श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी करणे
भीषण महायुद्धातही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे भ्रमण चालू असेल. ज्याप्रमाणे चिखलात कमळ फुलते, त्याप्रमाणे महायुद्धामुळे झालेल्या विनाशात, म्हणजेच चिखलात कमळरूपी साधक फुलवण्याचे कार्य श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ करतील.
‘हे श्रीमन्नारायणा, तुझ्या कृपाशीर्वादाने आम्हाला तुझी आणि तुझ्या या दोन रूपांची अगम्य कृपा ‘याची देही, याची डोळा’ पहायला मिळत आहे’, त्याबद्दल आम्ही तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. रोहित साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |