केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती

‘छत्तीसगड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’, ‘स्वावलंबी भारत अभियान’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने ‘कर्मचारी व्यक्तीमत्त्व विकास प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन

श्री. अभिजित पोलके

भिलाई (छत्तीसगड) – यशासाठी तणावमुक्त वातावरण आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण जितके अधिक सकारात्मक असेल, तितका संवाद चांगला होतो आणि उत्पादकता वाढते. ग्राहकांशी चांगला संवाद साधता न येणे, परस्पर मतभेद, नकारात्मक वातावरण आणि कार्यक्षमतेचा अभाव या सर्वांच्या मुळाशी मनुष्याचे स्वभावदोष असतात. या समस्यांचे तात्कालीक उपाय शोधण्याऐवजी आपण जर मूळ स्वभावदोषांवर मात करण्यासह साधना केली, तर त्याचा लाभ आपले वैयक्तिक जीवन, व्यवसाय आणि कुटुंब या सर्वांना होईल, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा समन्वयक श्री. अभिजित पोलके यांनी उद्घाटन सत्राच्या वेळी व्यक्त केले.

‘छत्तीसगड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’, ‘स्वावलंबी भारत अभियान’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ‘सिव्हिक सेंटरमधील’ सी.ए. भवन येथे ३ दिवसांच्या ‘कर्मचारी व्यक्तीमत्त्व विकास प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. याच्या उद्घाटनाच्या वेळी छत्तीसगडचे अर्थमंत्री श्री. ओ.पी.चौधरी ‘ऑनलाईन’ सहभागी झाले. या वेळी ते म्हणाले, ‘‘त्यांना व्यापार्‍यांच्या समस्या आणि अडचणी यांची पूर्ण जाणीव आहे. कोणत्याही अधिकार्‍यामुळे निर्माण होणार्‍या अनावश्यक अडचणींविषयी ते साहाय्य करण्यासाठी नेहमीच सिद्ध आहेत. व्यापारी कोणताही संकोच न करता त्यांच्या समस्या मांडू शकतात.’’

‘छत्तीसगड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे प्रदेश महामंत्री श्री. अजय भसिन, भिलाई शाखेचे अध्यक्ष श्री. गार्गी शंकर मिश्र, चेंबर ऑफ कॉमर्सचे श्री. दिनकर बसोतिया यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी सांघिक कार्य, नेतृत्व कौशल्ये, कर्मचार्‍यांमधील परस्पर संवाद आणि व्यक्तीमत्त्व विकास अशा महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. गार्गी शंकर मिश्र यांनी अध्यात्माद्वारे व्यक्तीमत्त्व विकासाला चालना देण्याच्या हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘हे आपल्या शाश्वत परंपरेचे वैशिष्ट्य आहे. या माध्यमातून आपण सर्व आदर्श नागरिक आणि यशस्वी व्यापारी बनू शकतो, आपला व्यवसाय वाढवू शकतो अन् राष्ट्र उभारणीत योगदान देऊ शकतो. यासह आज आपल्या प्रगतीसाठी व्यस्त दिनचर्येतून स्वतःसाठी वेळ काढून आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.’ श्री. भसिन यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाची भविष्यातील दिशा आणि परिणाम यांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील मिश्र यांनी केले.

वैशिष्ट्यपूर्ण

श्री. अजय भसिन यांनी हिंदु जनजागृती समितीशी संपर्क साधला आणि त्यांनी समितीचे साधक प्रत्यक्ष करत असलेल्या ‘तणाव नियंत्रण’ आणि ‘स्वभावदोष निर्मूलन’ यांविषयी माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला.