‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्‍या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !

१. ‘प्रसंगाचे आध्यात्मिक विश्लेषण करायला शिकणे’, हा ‘गुरुकृपायोगा’तील महत्त्वाचा आध्यात्मिक टप्पा असणे

‘गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकाचे उच्चतम ध्येय ‘श्री गुरुचरणांशी एकरूप होणे, म्हणजेच गुरुमय होणे’, हे आहे. मनुष्ययोनीत जन्म मिळाल्यावर जीवनाचे दोन उद्देश असतात – १. प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि २. मोक्षप्राप्ती अथवा ईश्वरप्राप्ती करणे.

साधना करत असतांना कुठलाही प्रसंग ‘चांगला किंवा वाईट’, असे काही नसते (इथे चांगला प्रसंग जिवाचा अहं वाढवून त्याला देवापासून दूर करू शकतो); मात्र स्वभावदोष आणि अहं यांमुळे जीव त्या प्रसंगाला ‘चांगले’ अथवा ‘वाईट’ ठरवतो. याउलट एखाद्या प्रसंगात सकारात्मक संघर्ष झाल्यास त्या प्रसंगामधूनही साधकाला देवाची प्राप्ती होते. साधना करतांना जीवनात अनेक कठीण प्रसंग घडत असतात. ते भौतिक, ऐहिक आणि सामाजिक दृष्ट्या वेदनादायी असतात; मात्र आपण त्यांचे आध्यात्मिक विश्लेषण समजून घेतले, तर त्यांतील भावनिक वेदना निघून जातात. त्यांतील दैवी तथ्य लक्षात आल्यावर जीव देवाच्या चरणी स्थिरावतो. त्यामुळे ‘प्रसंगाचे आध्यात्मिक विश्लेषण करायला शिकणे’, हा गुरुकृपायोगातील महत्त्वाचा आध्यात्मिक टप्पा आहे.

२. जीवनात घडणारे काही प्रसंग आणि त्यामागील योग्य आध्यात्मिक दृष्टीकोनात्मक विश्लेषण !

अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

२ अ. प्रसंग : काही वेळा साधना करणारा साधक किंवा साधिका यांचा तरुण वयात मृत्यू झाल्यास अन्य साधकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. ‘तो साधना करत होता, तर त्याचा मृत्यू तरुण वयात कसा झाला ? देवाने किंवा गुरूंनी त्याला वाचवले का नाही ? असे आहे, तर साधना करून काय उपयोग ?’, असे नकारात्मक विचार त्यांच्या मनात येतात.

२ अ १. आध्यात्मिक दृष्टीकोन : प्रत्येक जीव स्वतःचे निश्चित आयुष्यमान घेऊनच जन्माला येतो. तो जीव साधना करत असला किंवा नसला, तरीही त्याची मृत्यूची वेळ सुनिश्चित असते. देवाने त्या जिवास साधनेत आणून त्याचे भोग सकारात्मक पद्धतीने संपवण्यास साहाय्य केलेले असते. त्यामुळे मृत्यूनंतर त्याचा पुढचा जन्म साधनामय होण्यास साहाय्य होते. देव जिवाच्या जन्म किंवा मृत्यू या दोन्हींतही हस्तक्षेप करत नाही. तो जिवाची मोक्षाकडे वाटचाल होण्यासाठी जिवाला आवश्यक बुद्धी, गती आणि बळ प्रदान करतो. जीवनातील संघर्ष प्रत्येक जिवाने स्वतःच सहन करायचा असतो. त्यालाच ‘प्रारब्ध’ असे म्हणतात.

२ आ. प्रसंग : साधना करणार्‍या काही साधकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात किंवा साधकांचे त्यांच्या कुटुंबियांशी मतभेद होत असतात. तेव्हा त्यांच्याकडे पाहून अन्य साधक किंवा इतर यांच्या मनात ‘हे साधक साधना करत असूनही असे कसे वागतात ?’ किंवा ‘यांनी साधना करून काय उपयोग ?’, असे प्रतिक्रियात्मक किंवा नकारात्मक विचार येतात.

२ आ १. आध्यात्मिक दृष्टीकोन : जीव स्वतःचे संचितप्रारब्ध (मागील अनेक जन्मांतील प्रारब्धाचा काही भाग) समवेत घेऊनच पृथ्वीवर जन्माला येतो. जीव साधनेत असला, तरी त्याचे वर्तन हे प्राधान्याने प्रारब्धवश असते. जिवाची इतरांशी असलेली नाती देवाण-घेवाण संबंधांवर अवलंबून असतात. योग्य साधना केली, तर देवाण-घेवाण हिशोब संपून जिवाचा प्रवास मोक्षाकडे होतो, अन्यथा त्याची साधनेत घसरण होते, उदा. चांगली आध्यात्मिक पातळी असलेल्या अनेक जिवांचा अहं वाढल्यामुळे त्यांची साधनेत घसरण होते.

‘हे भगवंता, ‘आम्हा सर्व साधकांना तुझ्या प्राप्तीसाठी तुझ्या दृष्टीकोनांच्या साहाय्याने आणि तुला अपेक्षित असे प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ, शक्ती, बुद्धी अन् धैर्य प्रदान कर’, अशी तुझ्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (२५.४.२०२६)