शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई

प्रातिनिधिक चित्र

ठाणे, २२ जुलै (वार्ता.) – ठाणे शहरातील शाळा-महाविद्यालये, रुग्णालये आणि धार्मिक स्थळे यांच्या परिसरातील अनधिकृत पानटपर्‍या, चिकन-मटण यांची दुकाने, चिनी खाद्यपदार्थांचे कक्ष, तसेच अन्य अतिक्रमणे यांच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेने विशेष मोहीम चालू केली आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार पहिल्याच दिवशी मुंब्रा आणि वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात धडक कारवाई करण्यात आली.

१. मुंब्रा येथे ११ अनधिकृत पानटपर्‍या, ८ हातगाड्या आणि ४ अनधिकृत बाकडे हटवण्यात आली, तर वर्तकनगरमध्ये १० अनधिकृत पानटपर्‍यांवर कारवाई करून परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला.

२. वाढत्या अतिक्रमणाचे सूत्र नगरसेविका परिषा सरनाईक यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केले होते. त्यानंतर आयुक्तांनी प्रभावी कारवाईचे आश्वासन दिले होते.

संपादकीय भूमिका

अतिक्रमणे होऊच नयेत, यासाठी महापालिका काय प्रयत्न करणार ?