‘मागील ३५ वर्षे मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने साधना करू शकलो. या कालावधीत माझ्या समवेत असणारे अनेक सहसाधक साधनेपासून दूर गेले, तर काही साधक मात्र टिकून राहिले. टिकून राहिलेल्या सर्व साधकांची एकसारखी प्रगती झाली नाही; कारण ‘प्रगती होणे’ हे त्या साधकाची ‘तळमळ, भाव, त्याच्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण, त्याचे प्रारब्ध, आध्यात्मिक त्रास, त्याची सेवा करण्याची पद्धत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गुरुकृपा’ या सगळ्यांवर अवलंबून असते. दोन साधकांमध्ये आध्यात्मिक प्रगतीची तुलना होऊन एखादा साधक मनात विकल्प आल्याने साधनेपासून दूर जातो. याविषयी मला ठाऊक असलेला एक प्रसंग कथेच्या स्वरूपात पुढे देत आहे.

१. ‘व्यावहारिक दायित्वही आपलेपणाने कसे पार पाडावे ?’, हे सांगणारी कथा

१ अ. दोन मित्रांनी एकसारखे शिक्षण घेऊन एकाच आस्थापनात नोकरी करणे; मात्र एकाची व्यवहारात पुष्कळ प्रगती होणे : श्री. सुरेश चाकरमाने आणि श्री. माधव कर्मयोगी (नावे पालटली आहेत) नावाचे २ मित्र होते. दोघेही एकाच महाविद्यालयातून व्यवस्थापनाची (‘एम्.बी.ए.’ची) पदवी घेऊन एका नामांकित आस्थापनात नोकरीला लागले. त्यांनी अनेक वर्षे त्या आस्थापनात काम केले आणि वय समान असल्याने ते एकाच वर्षी निवृत्तही झाले. निवृत्तीनंतर सुरेशने त्याला मिळालेले पैसे अधिकोष आणि इतर ठिकाणी गुंतवले; परंतु आजारपण, मुलांची लग्ने आणि इतर कौटुंबिक कारणे यांमुळे १० वर्षांत त्याच्याकडील सर्व बचत संपली. अखेरीस त्याच्यावर पुन्हा नोकरी शोधण्याची वेळ आली. माधव मात्र कष्टाळू, प्रामाणिक आणि तळमळीने काम करणारा होता. त्याच्या कार्यक्षमतेमुळे त्याला त्या आस्थापनात उच्च पद मिळाले होते. निवृत्तीनंतर त्याने स्वतःचे आस्थापनही (कंपनीही) चालू केले.
१ आ. प्रगती झालेल्या मित्राने दुसर्या मित्राला दोघांमध्ये असलेला भेद सांगतांना वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याचे गमक सांगणे : सुरेश नोकरीच्या शोधात असतांना एके दिवशी त्याची माधवशी भेट झाली. तेव्हा माधवने प्रेमाने त्याला सांगितले, ‘तू माझ्या आस्थापनात नोकरी कर.’ त्यानंतर दोघांच्या गप्पा रंगल्या. सुरेशने विचारले, ‘आपण दोघेही एकाच ठिकाणी, एकाच वेळी कामाला लागलो आणि एकाच वर्षी निवृत्तही झालो. मग तू एवढ्या मोठ्या आस्थापनाचा मालक कसा झालास ? मी मात्र नोकरच राहिलो.’ माधव हसत म्हणाला, ‘याचे उत्तर एका छोट्याशा प्रसंगात दडले आहे. एकदा आपण रात्री उशिरापर्यंत कार्यालयात काम करून घरी निघालो होतो.
अर्ध्या मार्गावर आल्यानंतर आपल्या लक्षात आले की, ‘कार्यालयातील दिवे आणि पंखे चालूच राहिले आहेत.’ तेव्हा मी तुला म्हणालो, ‘चल, आपण परत जाऊन ते बंद करूया.’ तेव्हा तू म्हणालास, ‘ते आपले दायित्व नाही. आपण काम केले आणि आपल्याला पगार मिळाला. त्यापेक्षा अधिक काही करण्याची आवश्यकता नाही.’ त्यानंतर तू घरी गेलास; पण मी मात्र परत कार्यालयात गेलो. तेथील दिवे आणि पंखे बंद केले; कारण मी त्या कार्यालयाला माझेच समजत होतो. माझे कार्य केवळ पगारापुरते नव्हते, तर ते माझ्या कर्तव्याशी आणि आत्मीयतेशी जोडले होते. याच वृत्तीमुळे मला वरिष्ठांचा विश्वास संपादन करता आला, बढती मिळाली आणि आज स्वतःचा उद्योग उभा करण्याइतका अनुभव अन् आत्मविश्वास मिळाला. तुझ्या आणि माझ्या विचारांत हाच भेद होता. तू हक्कांचा विचार अधिक केलास; पण मी कर्तव्याचा विचार प्रथम केला. तू कामाला केवळ चाकरी समजलास; पण मी ते माझे दायित्व समजलो. कोणतेही कार्य ‘हे माझे आहे’ या भावनेने, तळमळीने आणि परिपूर्णतेने करण्याचा प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते.’
२. कथेतून शिकायला मिळालेली सूत्रे आणि साधकांनी करायचे प्रयत्न
ही कथा आपल्याला केवळ व्यावहारिक जीवनातीलच नव्हे, तर अध्यात्मातीलही अत्यंत महत्त्वाचे तत्त्व शिकवते. व्यवहारात जसे आपलेपणाने, प्रामाणिकपणे आणि तळमळीने कार्य केल्यास मनुष्य उच्च स्थान प्राप्त करून सुखी होतो, त्याचप्रमाणे साधना अन् सेवा करतांनाही हे तत्त्व अंगीकारल्यास गुरुकृपा होऊन साधकाचे जीवन आनंदमय होते.
२ अ. व्यष्टी साधना तळमळीने करावी ! : साधकाने नामजप, ध्यान, पूजा, प्रार्थना किंवा गुरूंनी सांगितलेली साधना आवडीने, भावपूर्ण, सातत्याने आणि परिपूर्णरित्या करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे अशा साधकांकडून देव मोठी समष्टी सेवा करवून घेतो.
२ आ. समष्टी सेवेत आत्मीयता असावी ! : आपण आश्रमात सेवा करत असू, गुरुगृही कार्य करत असू किंवा राष्ट्र-धर्माच्या कार्यात सहभागी असू, प्रत्येक सेवा करतांना ‘हे माझ्या गुरूंचे कार्य आहे, हे माझ्या राष्ट्राचे कार्य आहे किंवा हे माझ्या धर्माचे कार्य आहे’, या भावनेने ते करावे. सेवा ही केवळ कृती नसून ती भक्तीचे स्वरूप आहे.
२ इ. प्रत्येक कृती गुरूंना किंवा भगवंताला ज्ञात असते ! : स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर आपला प्रत्येक विचार, भावना, तसेच कृती यांची नोंद गुरु किंवा भगवंत घेतो; म्हणून प्रत्येक कृती त्यांना अपेक्षित अशी आणि शुद्ध भाव ठेवूनच करावी.
२ ई. अपेक्षारहित साधना आणि सेवा करावी ! : मन शुद्ध, पवित्र, निरागस आणि स्थिर ठेवून कोणतीही अपेक्षा न ठेवता साधना अन् सेवा केल्यास गुरुकृपा प्राप्त होते. गुरुकृपेने साधकाची आध्यात्मिक प्रगती वेगाने होते, जीवन आनंदमय बनते आणि तो मोक्षाच्या दिशेने वाटचाल करू लागतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सुचलेली ही सूत्रे त्यांच्या श्री चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.७.२०२६)
हिंदूंनो, धर्मशिक्षण घ्या आणि भगवंताची कृपा अनुभवा !
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !
गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !