आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

  • गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !

  • गुरुस्तवन भावांजली

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

गुरु हा सुखाचा सागरू ।
गुरु हा प्रेमाचा आगरू ।
गुरु हा धैर्याचा डोंगरू ।
कदाकाळी डळमळीना ।।

अर्थ : गुरु हा सुखाचा समुद्र आहे. तो प्रेमाचे आगर आहे, तसेच तो धैर्याचा डोंगर असून कोणत्याही अवस्थेमध्ये डगमगणारा नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

साधकांना निरंतर आनंद देणारे गुरु म्हणजे साक्षात् ‘आनंदसिंधु’ आहेत. लौकिक जगातील सुख हे क्षणभंगूर असते; परंतु गुरुकृपेने मिळणारा आनंद हा अक्षय (अखंड) असतो. ज्याप्रमाणे सागराचा तळ समजत नाही, त्याप्रमाणे गुरूंच्या ठायी असलेल्या आनंदाची व्याप्ती आपल्या लक्षात येत नाही. ते केवळ आनंदसागर नाहीत, तर प्रेमाचे ‘आगर’ (भांडार) आहेत. आई आपल्या बाळाची काळजी घेते, त्याहूनही अधिक पटींनी गुरु आपल्या शिष्याचा आध्यात्मिक स्तरावर सांभाळ करत असतात.

गुरु हे जणूकाही धैर्याचा महामेरू आहेत. साधकाला जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये खचू न देण्याचे सामर्थ्य केवळ गुरूंमध्येच असते. ते स्वतः स्थितप्रज्ञ असून कोणत्याही संकटात कधीही डगमगत नाहीत. त्यांची हीच स्थिरता साधकांमध्येही संक्रमित होते. साधना करतांना साधकांना शारीरिक, मानसिक किंवा कौटुंबिक स्तरावर कोणतीही अडचण आल्यास गुरूंची एखादी शिकवण किंवा त्यांचे केवळ स्मरणही साधकाला नवसंजीवनी देते.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव केवळ उपदेश करत नाहीत, तर साधकांच्या डोक्यावर सूक्ष्मातून आशीर्वादाचा हात ठेवून त्यांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढतात. ते साधकाला डगमगू देत नाहीत, हीच त्यांची खरी व्यापकता आहे. धैर्याचा महामेरू असलेल्या श्री गुरूंच्या श्री चरणी कोटी कोटी नमन !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२२.७.२०२६)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.