चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले

जीवितहानी नाही

मुंबई – चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी महानगरपालिका शाळेच्या आवारात पहाटे ३.३० वाजता ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड (लावलेला तात्पुरता अडथळा) कोसळले, तसेच याच्यासह शाळेसमोरील ३० मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचा भागही या वेळी कोसळला. शेजारी इमारतीचे बांधकाम चालू असल्याने ते बॅरिकेड तेथे उभारण्यात आले होते. पहाटे दुर्घटना घडल्याने जीवितहानी झाली नाही. बॅरिकेड हटवेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘शाळा चालू असतांना हे बॅरिकेड कोसळले असते, तर मोठी दुर्घटना घडली असती’, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महापालिका आणि संबंधित अभियंते यांच्याकडून बॅरिकेड हटवण्याचे काम चालू आहे.