रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या आगमनाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील विविध गुणांचे झालेले दर्शन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला रामनाथी आश्रमातील श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या आगमनाचा सोहळा अनुभवण्यास मिळाला; म्हणून मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे. श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे रामनाथी आश्रमात आगमन होणार होते, त्या रात्री ८ वाजता आम्ही (मी आणि श्री. सुमित सागवेकर) आगगाडीने प्रसारसेवेसाठी बाहेरगावी जाणार होतो; परंतु देवाला आम्हाला भरभरून द्यायचे होते. आम्ही जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देवाने आमच्याकडून सेवा करवून घेतली. ही सेवा करतांना देवाने मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील विविध गुणांचे दर्शन घडवले. त्याविषयी आणि सेवा करतांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घाईत असूनही त्यांनी प्रेमाने विचारपूस करणे, त्या वेळी ‘श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या आगमनाच्या सोहळ्यातून देवाला जे द्यायचे होते, ते श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या एका वाक्यातून मिळाले’, असे वाटणे

श्री. हर्षद खानविलकर

सकाळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सरस्वतीदेवीच्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी सभागृहात आल्या. त्या वेळी मी तिथे होतो. त्या मला म्हणाल्या, ‘‘आज आहेस ना ?’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘हो. संध्याकाळी निघणार आहे.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘संध्याकाळपर्यंत आहेस ना ? मग ठीक आहे.’’ त्या घाईत असूनही त्यांनी माझी प्रेमाने विचारपूस केली. त्यांच्याशी झालेल्या या संभाषणामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘या सोहळ्यातून देवाला मला जे द्यायचे होते, ते श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या एका वाक्यातून मिळाले’, असे मला वाटले.

२. श्री सिद्धिविनायक मूर्तीच्या आगमनाच्या मिरवणुकीच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील विविध गुणांचे दर्शन होणे

श्री सिद्धिविनायकाची मूर्ती मिरवणुकीद्वारे आश्रमात आणायची होती. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मिरवणुकीत आरंभापासून उपस्थित होत्या. त्या वेळी त्यांचे रूप पुष्कळ तेजस्वी दिसत होते. ‘साक्षात् देवी श्री गणेशाच्या आगमनासाठी आली आहे’, असे मला जाणवले. देवाने मला त्यांच्या विविध गुणांचे दर्शन करवून देऊन पुष्कळ काही शिकवले.

२ अ. कडक ऊन असल्याने डांबरी रस्ता तापलेला असतांना पाय भाजत असूनही संपूर्ण मिरवणुकीत अनवाणी चालणे : त्या वेळी कडक ऊन होते. रस्ता पुष्कळ तापलेला होता, तरी संपूर्ण मिरवणुकीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी चपला घातल्या नाहीत. त्या अनवाणी चालल्या. तेव्हा ‘देव आपल्याकडे आला आहे. आपण देहभान विसरून त्याची सेवा कशी करायला हवी ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

२ आ. सहजता आणि इतरांचा विचार करणे : ऊन होते; म्हणून एका साधकाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या डोक्यावर छत्री धरली. तेव्हा त्यांनी स्वतः छत्री हातात पकडली आणि त्या साधकाला अन्य सेवा करण्यास सांगितले. त्या समवेत असणार्‍या साधकांना छत्रीच्या सावलीत येण्यास सांगत होत्या. त्या वेळी ‘इतरांचा विचार करणे, प्रेमभाव, ‘स्व’चे अस्तित्व न जपणे आणि सहजता’ हे त्यांच्यातील गुण शिकायला मिळाले. मधे मधे त्या आम्हाला (मूर्ती उचलणार्‍या साधकांना) पाणी देण्यास सांगून आमची काळजी घेत होत्या.

२ इ. निर्णयक्षमता : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आम्हाला सतत सांगत होत्या, ‘‘श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे मूर्तीकार पंचशिल्पकार श्री. नंदा आचारी सांगतील, त्या पद्धतीने आपण ती हाताळूया.’’ त्यामुळे आम्हाला मूर्ती वाहनातून उतरवणे आणि ठेवणे सोपे गेले.

२ ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या अस्तित्वामुळे सर्वांमध्ये उत्साह होता. ‘त्यांच्या अस्तित्वामुळे सर्वकाही निर्विघ्नपणे होत आहे’, असे जाणवले.

३. मिरवणूक आश्रमाच्या जवळ येत होती. तसे श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या मुखावरील भाव पालटत होते. ‘श्री सिद्धिविनायकाला आश्रमात पोचायची ओढ अधिक लागली आहे’, असे वाटत होते.

४. सर्वच साधकांच्या तोंडवळ्यावर एक वेगळाच आनंद होता.

५. गुरुमाऊली आणि लक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी श्री सिद्धिविनायकाचे पूजन केल्यावर मूर्तीत सकारात्मक पालट जाणवणे

आश्रमात आल्यावर मूर्तीचे विधीवत् पूजन करण्यात आले. श्री विष्णुस्वरूप गुरुमाऊली आणि लक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी श्री सिद्धिविनायकाचे पूजन केले. वाहनातून उतरवल्यानंतरची मूर्ती आणि पूजन झाल्यावरची मूर्ती यांत पुष्कळ पालट जाणवला. पूजा झाल्यावर मूर्ती हसरी आणि आनंदी वाटली अन् तुलनेत ‘तिच्यातील चैतन्य पुष्कळ वाढले आहे’, असे जाणवले.

६. आश्रमातून निघतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी प्रसाद दिल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटणे

सेवा संपायला सायंकाळचे सात वाजले आणि आमची निघायची वेळ झाली. निघतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची भेट झाली. आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळाला. आमच्याकडून श्री सिद्धिविनायकाची सेवा झाली; म्हणून त्यांनी आम्हा दोघांना आठवणीने प्रसाद देण्यास सांगितले. त्या वेळी मला पुष्कळच कृतज्ञता वाटली, ‘देव श्रीसत्शक्ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या माध्यमातून किती प्रीती करतो ?’, हे मला अनुभवायला मिळाले.

माझी काही पात्रता नसतांना एवढ्या अनमोल सोहळ्यात गुरुकृपेने मला सेवा मिळाली. यासाठी केवळ आणि केवळ कृतज्ञता व्यक्त करतो. ‘अशीच कृपा अखंड असू दे’, हीच श्रीगुरुचरणी प्रार्थना आहे.’

– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र. (२७.५.२०२०)

श्री सिद्धिविनायकाची मूर्ती उचलण्याची सेवा करतांना श्री. हर्षद खानविलकर यांना आलेल्या अनुभूती !

१. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती उचलण्याची सेवा मिळणे आणि दुपारच्या वेळी मूर्ती आणण्यासाठी गेल्यावर पाय भाजत असूनही त्रास न होणे

श्री सिद्धिविनायकाची मूर्ती संपूर्ण पाषाणाची असून ती साधारणपणे ५०० किलो वजनाची आहे. तिला उचलण्यासाठी ८ जणांचा गट केला होता. मूर्ती आश्रमात आणण्यापूर्वी संशोधनाच्या दृष्टीने ‘यु.ए.एस्’ या उपकरणाने तिची प्रभावळ मोजण्यासाठी मूर्तीला वाहनातून खाली उतरवण्यात आले. त्या वेळी ती पुष्कळच जड असल्याचे आमच्या लक्षात आले. ती भर दुपारची वेळ होती. डांबरी रस्ता गरम झाल्याने सर्वांचेच पाय भाजत होते. आम्ही सर्वांनी शरण जाऊन प्रार्थना करून मूर्ती वाहनातून उतरवली. मूर्ती उतरवल्यानंतर पुन्हा उचलतांना सोपे जावे; म्हणून एक लाकडी ठोकळा बनवला होता. त्या ठोकळ्याचा आकार (बेस) आणि मूर्तीचा तळभागाचा आकार (बेस) एकाच मापाचे झाले होते. त्यामुळे मूर्ती ठोकळ्यात बसवण्यास अडचण आली. मूर्ती ठोकळ्यात बसवल्यानंतर मूर्तीची प्रभावळ मोजण्यात आली. पुन्हा ती मूर्ती वाहनात ठेवून आगमनाच्या ठिकाणी न्यायची होती. त्या वेळी आम्हाला मूर्ती उचलणे शक्य होत नव्हते. तेव्हा मूर्तीचे मूर्तीकार पंचशिल्पकार श्री. नंदा आचारी यांना विचारून गणपतीचा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष करत ती हळूहळू वाहनात चढवली. उन्हामुळे आमचे पाय पुष्कळ भाजत होते, तरी कुणाला त्रास झाला नाही. तेव्हा सगळ्यांचा शरणागतभाव आणि संघटितभाव लक्षात आला. श्री गणेशाच्या कृपेने ही सेवा निर्विघ्नपणे झाली.

२. मूर्तीचे दर्शन झाल्यावर साधकांना तिच्यात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा असल्याचे लक्षात आले, तसेच तिला हाताळतांना शक्ती अनुभवायला मिळाली. (२७.५.२०२०)

येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक