मुंबईत अवैधपणे पैसे वसूल करणार्‍या ‘क्लीनअप मार्शल’वर गुन्हे नोंद करणार ! – महापौर

मुंबई – ‘क्लीनअप मार्शल’ सामान्यांकडून अवैधपणे पैसे वसूल करत आहेत, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने उघडकीस आणले. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी संबंधित ‘क्लीनअप मार्शल’वर (कंत्राटी कामगारांवर) फौजदारी गुन्हे नोंद करणार आहे’, अशी माहिती दिली.

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न घातल्यास प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्याचे अधिकार ‘क्लीनअप मार्शल’ला दिले आहेत; परंतु ते अनेकांना दंडाची पावती न देता त्यांच्याकडून १०० ते १५० रुपये घेतात आणि त्यांना सोडून देतात. एका महिला क्लीनअप मार्शलने प्रतिदिन ५०० रुपयापर्यंत ‘वरची’ कमाई होत असल्याचे ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये मान्य केले होते.

यासंदर्भात भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, या प्रकरणाची पोलीस चौकशी होण्याची आवश्यकता आहे. ‘क्लीनअप मार्शल’ हे कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची पहिली पायरी आहे. हा पैसा कुणापर्यंत पोचतो, याची चौकशी झाली पाहिजे. यावर श्वेतपत्रिका काढण्याचीही आवश्यकता आहे.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीने मुखपट्टी घातली पाहिजे; परंतु अशा प्रकारे सामान्यांची लूट होणे धक्कादायक आहे. या प्रकरणी ४ ऑक्टोबर या दिवशी आयुक्तांसह संबंधित ठेकेदारांची बैठक घेऊन संबंधित आरोपींवर फौजदारी गुन्हा नोंद करणार आहे. तसेच संबंधित ठेकेदारांना काळ्या सूचीत टाकण्यात येईल’, असे पेडणेकर यांनी घोषित केले आहे.