भारतातही विजेचे संकट निर्माण होण्याची शक्यता

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – चीनप्रमाणेच भारतात विजेचे संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील औष्णिक विद्युत् प्रकल्पांना कोळशाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेक वीज प्रकल्पांमधील विजेचे उत्पादन बंद झाले आहे, तर आणखी अनेक प्रकल्पांमधील वीज उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. भारत ऑस्ट्रेलियाहून कोळशाची आयात करतो. सध्या चीनच्या बंदरांमध्ये भारताकडे येणारा २० लाख टनांहून अधिक (२०० कोटी किलोंहून अधिक) औष्णिक कोळसा अनेक मासांपासून पडून आहे. चीनच्या बंदरांवर कोळसा पडून असल्याने भारतामध्ये विजेचे संकट निर्माण होऊ शकते. ऑस्ट्रेलिया सध्याच्या घडीला भारताला १२ ते १५ डॉलर प्रतिटन दराने कोळसा विकतो. हा जगातील सर्वांत स्वस्त कोळसा असून त्याचा दर्जादेखील चांगला आहे.