चीनच्या अतिक्रमणाच्या विरोधात नेपाळी नागरिकांकडून आंदोलन

अशा प्रकारची आंदोलने करून चीनवर त्याचा काही परिणाम होणार नाही. त्यापेक्षा जनतेने नेपाळच्या सरकारवर दबाव निर्माण करून त्याला चीनविरोधी भूमिका घेण्यास भाग पाडले पाहिजे ! – संपादक

काठमांडू (नेपाळ) – चीनकडून होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात नेपाळमधील जनतेकडून आंदोलन करण्यात आले. ‘चीनने त्याच्या विस्तारवादाला आवर घालावा आणि नेपाळची कह्यात घेतलेली भूमी परत करावी’, अशी मागणी करण्यात आली. या वेळी आंदोलकांनी ‘चीनने आमची भूमी परत करावी’ आणि ‘चीन परत जा’ अशा घोषणाही दिल्या. काठमांडूमध्ये ‘लोकतांत्रिक युवा मंचा’च्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यात अनुमाने २०० नागरिकांनी सहभाग घेतला.

१. एका अहवालानुसार चीनने नेपाळच्या भूमीवर बांधकाम करायला प्रारंभ केला असून आतापर्यंत १२ ते १५ इमारती बांधल्या आहेत. ‘या इमारती नेपाळच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आल्या असून त्या तातडीने हटवाव्यात’, अशी मागणी नेपाळी जनतेने केली आहे. यामुळे चिनी आणि नेपाळी नागरिकांमध्ये अनेकदा संघर्ष उफाळून येत आहे. चिनी नागरिकांना प्रवेश करू न देण्याची भूमिका नेपाळी नागरिकांनी घेतली आहे.

२. नेपाळचे पंतप्रधान शेख बहादूर थापा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना केली आहे. नेपाळच्या हुमला भागात चीनकडून झालेल्या अतिक्रमणाविषयी अभ्यास करून ही समिती सरकारला अहवाल देणार आहे.

३. यापूर्वीच्या के.पी. ओली शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चीनकडून अतिक्रमण झालेच नसल्याचा दावा केला होता. त्या सरकारनेदेखील १९ सदस्यांची समिती नेमली होती; मात्र त्यानंतरही चीनचे अतिक्रमण चालूच असून नेपाळी नागरिकांना या भागात रहाणे कठीण होत चालले आहे.