राज्यातील निवासी आधुनिक वैद्य आजपासून संपावर !

कोरोना संसर्गाच्या काळातील शैक्षणिक शुल्क माफ न केल्याचे प्रकरण

निवासी आधुनिक वैद्यांनी कोरोनाच्या काळात चांगली सेवा देऊनही त्यांच्या मागण्यांची पूर्तता न करणे, हे अयोग्य आहे. जर मागणी पूर्ण करायची नव्हती, तर निवासी आधुनिक वैद्यांना आश्वासन का दिले ? संपामुळे होणार्‍या हानीभरपाईचे दायित्व  कोण घेणार ? त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून होणारा संप टाळावा आणि निवासी आधुनिक वैद्यांनी संपाऐवजी वैध मार्गांचा अवलंब करावा. संप म्हणजे राष्ट्राची हानी करण्यासारखे आहे. – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी निवासी आधुनिक वैद्यांना कोरोनाच्या काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु प्रत्यक्षात काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे या मागणीसह इतर मागण्यांसाठी निवासी आधुनिक वैद्यांनी १ ऑक्टोबरपासून राज्यभरात संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या पहिल्या दिवसापासून निवासी आधुनिक वैद्य सेवा देत आहेत. त्याला २ वर्षे पूर्ण होत असून या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानीही झाली आहे.

‘निवासी आधुनिक वैद्यांनी पहिल्या लाटेनंतर शुल्क माफीची मागणी केल्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी ती मान्य करण्याचे आश्वासन निवासी आधुनिक वैद्यांच्या संघटनेला (‘मार्ड’ला) दिले आहे’, असे निवासी आधुनिक वैद्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्यातही निवासी आधुनिक वैद्यांनी पूर्ण शक्तीनिशी सेवा दिली; परंतु या आधुनिक वैद्यांचे शुल्क माफ करण्याविषयी सरकारकडून काहीच कार्यवाही झाली नाही. शेवटी निवासी आधुनिक वैद्यांनी वरील निर्णय घेतला आहे.