३ सदस्यीय प्रभाग रचनेमुळे शिवसेनेला लाभच ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना  

मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, ३० सप्टेंबर – गेल्या वर्षभरापासून शिवसेनेने कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची जोरदार सिद्धता केली आहे. अनेक भागांत शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आघाडी घेतल्याचे चित्र सिद्ध झाले. असे असतांना ३ सदस्यीय प्रभाग रचनेमुळे अनेक इच्छुकांची घालमेल होणे सहाजिकच आहे; परंतु कुणीही चिंता करण्याचे कारण नाही. जे झाले ते चांगलेच झाले असून, त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे शिवसेनेला लाभच होणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचा मेळावा शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘आसपासच्या प्रभागातील इच्छुकांनी एकसंघ होऊन कामाला लागावे. पदाधिकार्‍यांनी मतदार नोंदणीसह इतर माध्यमांतून अधिकाधिक मतदारापर्यंत पोचावे. सर्वांनी त्यांचे दायित्व ओळखून कामाला लागा. शिवसेनेचा पहिला महापौर करण्यास सज्ज व्हावे.’’ या प्रसंगी माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन अंकुश निपाणीकर यांनी केले. या मेळाव्यासाठी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, महेश उत्तुरे, सुहास सोरटे, माजी नगरसेवक अजित मोरे, माजी नगरसेवक राजू हुंबे, दीपक गौड, किशोर घाटगे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.