सनातनचे हितचिंतक आणि गोव्यातील साहित्यिक श्री. महेश पारकर यांनी बोरी (गोवा) येथील सनातनच्या साधिका कै. (सौ.) दर्शना बोरकर यांच्या स्मृतीस दिलेला उजाळा !

३.६.२०१८ या दिवशी बोरी (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. दर्शना बोरकर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५८ वर्षे होते. शिरोडा येथील साहित्यिक श्री. महेश पारकर यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (सौ.) दर्शना बोरकर
श्री. महेश पारकर

१. मनमोकळ्या आणि लाघवी स्वभावामुळे  कै. (सौ.) दर्शना बोरकर यांनी लोकांना आपलेसे करून सनातनच्या कार्यात सहभागी करून घेणे अन् त्यांच्यात विरोधकांनाही आपलेसे करण्याचे कसब असणे

‘सौ. दर्शनाताई बोरकर आकस्मिकपणे आमच्यातून निघून गेल्या. त्यांनी सनातन संस्थेच्या कार्याला प्रारंभापासून वाहून घेतले होते. त्यांच्या मनमोकळ्या आणि लाघवी स्वभावामुळे त्यांनी लोकांना आपलेसे करून सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी करून घेतले होते. शिरोडा, बोरी आणि फोंडा या परिसरांत संस्थेचे जे कार्य उभे राहिले आहे, त्या कार्यात  कै. बोरकरताईंचा वाटा पुष्कळ महत्त्वाचा आहे. त्यांनी एक प्रकारे साधकांची फळीच उभी केली आहे.

त्यांचा पेशा शिक्षिकेचा ! त्यांनी तन्मयतेने शिकवून शेकडो विद्यार्थी घडवले आणि त्याच समर्पण भावनेने त्यांनी अनेकांना सनातन संस्थेकडे साधनेसाठी वळवले. मुख्य म्हणजे सनातन संस्था आणि तिचे कार्य यांना काही ठिकाणी विरोध होत असतांनाही त्यांनी हे कार्य केले. कै. दर्शनाताई ईश्वरी कार्याचे महत्त्व आणि त्यातील बारीक-सारीक सर्व पैलू उपस्थितांसमोर मांडायच्या. त्यांचे ते कसब आणि त्यांना असलेली समाजाविषयीची आपुलकी यांमुळे त्या विरोधकांनाही आपलेसे करायच्या. त्या विरोधकांच्या मनातील विरोधाची तीव्रता न्यून करायच्या. त्यांनी शिरोडा आणि बोरी परिसरांत रहाणार्‍या व्यक्तींवर स्वतःची छाप पाडली होती.

२. कोरोना महामारीच्या काळात तणावग्रस्त  समाजाला साधनेकडे वळवण्याची आवश्यकता लक्षात येऊन कै. (सौ.) दर्शनाताईंच्या आठवणी जागृत होणे

‘कै. दर्शनाताई धर्मप्रचार करत असलेल्या शिरोडा आणि बोरी या परिसरांत सध्याच्या कठीण (कोरोना महामारीच्या) काळात संस्थेच्या कार्यास अधिक चालना मिळणे अत्यावश्यक आहे’, असे वाटते. आज लोक कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भयग्रस्त असून ताणाखाली आहेत. त्यावर ‘साधना करणे’ हाच पर्याय आहे. जनतेला साधनेविषयी किमान प्राथमिक ज्ञान मिळाले, तरी आपला हिंदु समाज स्थिरस्थावर होऊ शकतो. अशा प्रसंगी दर्शनाताईंची तीव्रतेने आठवण येत आहे. ‘त्यांनी या कार्यामध्ये पुढाकार घेऊन समाजाची विस्कटलेली घडी स्थिरस्थावर केली असती’, असे आज प्रकर्षाने वाटत आहे.

३. कै. (सौ.) दर्शना बोरकर यांच्या निधनानंतर कवितेच्या ओळी सुचणे आणि ‘त्यांच्या आदर्शवत् कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी’, असे वाटणे

दर्शनाताईंच्या निधनानंतर काही दिवसांनी मला कवितेच्या ओळी सुचल्या होत्या. त्यांच्या आकस्मिक जाण्याने माझे मन विषण्ण झाले होते. त्यांच्याविषयी सुचलेल्या कवितेच्या ओळी भराभर कागदावर उतरवल्यानंतर माझे मन थोडेसे हलके झाले. (ही कविता खाली दिली आहे. – संकलक) दर्शनाताई आपल्यातून गेल्या; पण त्यांनी संस्थेच्या कार्यासाठी वाहून घेऊन केलेल्या प्रयत्नांच्या अनेक आठवणी आहेत. माझ्या या छोट्याशा प्रयत्नानंतर त्या आठवणींना उजाळा मिळत राहो. ताईंनी केलेले कार्य तितकेच महत्त्वाचे आणि आदर्शवत् आहे. ‘त्यांनी संस्थेच्या उभारणीसाठी केलेल्या कार्याची प्रेरणा इतरांना मिळत राहो आणि त्यांच्या कार्याचे अमृतसिंचन येणार्‍या काळात हिंदु समाजावर होत राहो’, एवढीच  माझी इच्छा आहे.’

– श्री. महेश पारकर (कोकणी आणि मराठी साहित्यिक), शिरोडा, गोवा. (१८.६.२०२१)

संदेश एकच हिंदु धर्मविरांना, अधिक जोमाने आता कार्य करा ।

ललकारी ही विजयाची ।
साधिकेच्या प्रयत्नरत मशालीची ।
सांग मृत्यो, काय तू मिळविले ।
हिरावून नेतांना ज्योत तिच्या प्राणाची ।। १ ।।

आदर्श मूर्ती दर्शनाताईची ।
मैदानी जशी राणी झाशीची ।
शस्त्रे केवळ शब्दांची मुखी ।
त्या आधारे देई दीक्षा सनातनची ।। २ ।।

हिंदुहिताची हृदयी शक्ती ।
परम पूज्यांनी (टीप १) दिली मिळकत साधनेची ।
अंतिम क्षणापर्यंत कार्यमग्न दर्शनाताई ।
मृत्यो, तव महानता अल्प जाहली ।। ३ ।।

हिंदु राष्ट्राची ललकारी गगनभेदी ।
संस्थेने रुजवलेल्या निश्चयी कार्याची ।
अंतिम ध्येयाची आता आशा ।
बलीदानाने दर्शनाताईच्या प्रज्वलित केली ।। ४ ।।

संदेश एकच हा हिंदु धर्मविरांना ।
अधिक जोमाने आता कार्य करा ।
दर्शनाताई स्वर्गातून कार्याचे अवलोकन करी ।
आता माघार घ्यायची नाही ।। ५ ।।

टीप १ : परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी

– श्री. महेश पारकर (कोकणी आणि मराठी साहित्यिक), शिरोडा, गोवा. (१८.६.२०२१)