महंत नरेंद्र गिरि यांचे उत्तराधिकारी म्हणून बलवीर गिरि यांच्या नावावर पंच परमेश्‍वरांचा शिक्कामोर्तब

महंत नरेंद्र गिरि आणि शिष्य बलवीर गिरि

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे दिवंगत महंत नरेंद्र गिरि यांचे शिष्य बलवीर गिरि यांना महंत नरेंद्र गिरि यांचे उत्तराधिकारी घोषित करण्यात आले आहे. आखाडा परिषदेच्या पंच परमेश्‍वरांनी (५ पंचांनी) महंत नरेंद्र गिरि यांच्या इच्छेनुसार हा निर्णय घेतला आहे. येत्या ५ ऑक्टोबर या दिवशी बाघंबरी मठाचे दायित्व त्यांना सोपवण्यात येणार आहे. महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या खोलीत एक पत्र सापडले होते, ज्यात त्यांनी बलवीर गिरि यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते; मात्र मठाच्या पंच परमेश्‍वरांनी हे पत्र बनावट असल्याचे सांगून बलवीर गिरि यांना त्यांचा उत्तराधिकारी बनवण्यास नकार दिला होता. यानंतर नरेंद्र गिरि यांची जून २०२० मध्ये बनवण्यात आलेल्या मृत्यूपत्राचा खुलासा झाला, ज्यात त्यांनी बलवीर गिरि यांना त्यांचा उत्तराधिकारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या आधारावरून बलवीर गिरि यांनी उत्तराधिकारी करण्यात येणार आहे.

नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे अन्वेषण सीबीआयकडून चालू

महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणी सीबीआयकडून गेल्या ६ दिवसांपासून अन्वेषण केले जात आहे. या प्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या आनंद गिरी, आद्याप्रसाद तिवारी आणि संदीप तिवारी यांची स्वतंत्रपणे ७ घंटे चौकशी केली.