विकलांग असूनही आंतरिक साधनेतून आनंद अनुभवणारी बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. विशाखा राजेंद्र आगावणे (वय २३ वर्षे) !

कु. विशाखा आगावणे

कु. विशाखा राजेंद्र आगावणे विकलांग असूनही आनंदावस्थेत आणि सतत देवाच्या अनुसंधानात असते. भाद्रपद कृष्ण पक्ष सप्तमी (२८.९.२०२१) या दिवशी तिचा २३ वा वाढदिवस आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये ती रामनाथी आश्रमात आल्यावर तिच्या बहिणीला तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे, रामनाथी आश्रमात येऊन गेल्यानंतर तिच्यात जाणवलेले पालट आणि ‘हरे कृष्ण’ संप्रदायानुसार साधना करणारे विशाखाचे मामा श्री. संतोष परहार यांना तिच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

(भाग १)

कु. विशाखा राजेंद्र आगावणे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. कु. मयुरी आगावणे (मोठी बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. कु. विशाखा रामनाथी आश्रमात आल्यावर तिच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे : ‘कु. विशाखा विकलांग आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये ती १०-१२ दिवसांसाठी रामनाथी आश्रमात येऊन गेली. आश्रमात येऊन गेल्यानंतर तिच्यामध्ये पुष्कळ पालट जाणवले.

१ अ १. रामनाथी आश्रमात येण्यासाठी दूरचा प्रवास करूनही त्रास न होणे : विशाखा विकलांग असल्याने ती सतत झोपलेली असते. बार्शी (सोलापूर) येथून रामनाथी आश्रमात येण्यासाठी १३-१४ घंटे लागतात. जेव्हा तिला कळले की, आपल्याला आश्रमात जायचे आहे, तेव्हा ‘ती आनंदी आहे’, असे आम्हाला जाणवत होते. ‘एवढा प्रवास करूनही ती दमली आहे किंवा तिला त्रास होत आहे’, असे तिच्या तोंडवळ्यावरून जाणवत नव्हते.

१ अ २. आश्रमात आल्यावर ‘ती आश्रमाचे चैतन्य ग्रहण करत आहे’, असे आम्हाला जाणवायचे.

१ अ ३. पू. सौरभ जोशी यांच्या भेटीची ओढ लागणे : पू. सौरभदादांशी (सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी (वय २५ वर्षे) यांना)) भेटण्याची वेळ निश्चित झाली होती; पण काही कारणामुळे त्या दिवशी त्यांना भेटता येणार नव्हते. जेव्हा हे मी तिला सांगितले, तेव्हा ती रडायला लागली. तिला ‘कधी एकदा पू. दादांना भेटू ?’, असे वाटत होते. तेव्हा आम्हाला तिची समजूत काढावी लागली.’ (२५.८.२०२०)

२. सौ. राजश्री आगावणे (आई), बार्शी, जिल्हा सोलापूर.

सौ. राजश्री आगावणे

२ अ. रामनाथी आश्रमात जाऊन आल्यावर कु. विशाखा हिच्यात जाणवलेले पालट

२ अ १. ‘आश्रमातील एका संतांचा सत्संग लाभल्यापासून विशाखाची आनंदावस्था वाढली आहे.

२ अ २. एकटी रहायला शिकणे आणि आनंदी असणे : पूर्वी विशाखाला मी ‘सेवेला जाऊ का ?’, असे विचारल्यावर ती लगेच ‘जा’ म्हणायची; पण वैयक्तिक कामासाठी जायचे असल्यास होकार देत नसे. आता मला कोणत्याही कारणासाठी बाहेर जावे लागत असेल, तर ती ‘जा’ म्हणते. आता ती एकटी रहायला शिकली आहे आणि आनंदीही असते.

२ अ ३. परिस्थिती स्वीकारणे : डिसेंबर २०१९ मध्ये तिच्या चुलत बहिणीचे लग्न होते. त्यामुळे मला सतत तिकडे जावे लागे. तेव्हा तिने कधीच तक्रार केली नाही. ती एकटी रहायची; पण ‘ती एकटी आहे’, असे मला कधीच जाणवले नाही. लग्नाच्या दिवशी ‘तिला लग्नस्थळी नेऊया’, असे ठरले. मी तिचे आवरले; पण कार्यालयात व्यवस्थित सोय नसल्याने ऐन वेळी तिला तेथे नेण्याचे रहित करावे लागले. तिला तेथे नेण्याची अडचण सांगितल्यावर तिने ते मनापासून स्वीकारले. त्या दिवशी ती जवळजवळ ४ घंटे एकटी राहिली.

२ आ. ‘हरे कृष्ण’ संप्रदायानुसार साधना करणारे विशाखाचे मामा श्री. संतोष परहार यांना विशाखाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे : दोन मासांपासून माझा मामेभाऊ (विशाखाचे मामा) श्री. संतोष परहार यांच्याशी माझा संपर्क झाला. ते ‘हरे कृष्ण’ या संप्रदायानुसार साधना करतात. ते दळणवळण बंदीच्या काळात आमच्या घरी आले होते. त्या वेळी बर्‍याच दिवसांनी त्यांनी विशाखाला पाहिले. त्यांना विशाखामध्ये आध्यात्मिक प्रगती जाणवली.

२ आ १. सूक्ष्मातून बोलत असल्याचे जाणवणे : त्यांना ‘विशाखा त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलते’, असे जाणवते. पहिल्यांदा त्यांना भेटल्यावर ‘ती त्यांच्याकडे पुष्कळ आत्मीयतेने पहात होती आणि त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलत होती’, असे मलाही जाणवत होते.

२ आ २. विशाखाने सूक्ष्मातून येऊन लढाऊ वृत्तीने नामजप करण्यास शिकवणे : नृसिंह जयंतीच्या दिवशी त्यांना ‘तिच्याजवळ बसून जप करावा’, अशी इच्छा झाली. १८.५.२०२० या दिवशी मला त्यांचा भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘विशाखा सूक्ष्मातून माझ्याकडे आली होती आणि म्हणाली, ‘चल, नृसिंह भगवंताचा नामजप करूया.’’ त्या वेळी विशाखाने त्यांच्या समवेत १ माळ जप केला. त्या वेळी त्यांच्याकडून सहजतेने जप होत होता. तेव्हा ‘लढाऊ वृत्तीने जप कसा करायचा ? वैदिक पद्धतीने उच्चार कसे असावेत ?’, हेही तिने त्यांना सांगितले. त्या दिवशी तिने शिकवल्याप्रमाणे श्री. संतोष यांच्याकडून नामजप होत होता.

२ आ ३. विशाखाच्या शरिराचे कंपन वाढणे आणि हा त्रास नसल्याचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ अन् श्री. संतोष यांनी सांगणे : दुपारी तिच्या शरिराची कंपने (व्हायब्रेशन्स) वाढली होती. तेव्हा याविषयी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारल्यावर त्यांनी ‘तिला काही त्रास जाणवत नाही’, असे सांगितले. श्री. संतोष यांनाही ‘तिला त्रास नाही. उलट तिच्या देहातून आनंदाच्या लहरी बाहेर पडत आहेत’, असे जाणवले.

२ आ ४. ‘शरिराची कंपने होणे’, हे सप्तचक्रे जागृत झाल्याचे लक्षण असणे : तिच्या शरिराची कंपने वाढलेली पाहून ‘काय करावे ?’, हे मला सुचेना. त्या दिवशी दुपारी श्री. संतोष स्वतःच घरी आले होते. त्या वेळीही ती पुष्कळ आनंदी होती. ती श्री. संतोष यांना हसून प्रतिसाद देत होती. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘ज्या वेळी एखाद्याला शारीरिक व्याधीने त्रास होतो, तेव्हा त्याच्या तोंडवळ्यावरचे भाव वेगळे असतात; परंतु तिची सप्तचक्रे जागृत होत आहेत. त्यामुळे तिची आनंदावस्थाच आहे.’’

२ आ ५. वृंदावनात घेऊन जाण्याविषयी विशाखा डोळ्यांतून सांगत असतांना तिच्या तोंडवळ्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना भेटल्यासारखे भाव जाणवणे : श्री. संतोष यांनी तिला विचारले, ‘‘वृंदावनात जायचे का ?’’ त्या वेळी मला ‘ती ‘मला घेऊन चला’, असे त्यांना डोळ्यांतून सांगत आहे’, असे जाणवले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना पहिल्यांदा भेटल्यावर तिच्या तोंडवळ्यावर जसे भाव होते, तसेच भाव तिच्या तोंडवळ्यावर जाणवत होते.

२ आ ६. आई आणि बहीण यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असणे : संध्याकाळी तिच्या शरिराची कंपने आणखी वाढली. त्या वेळी ‘तिच्यासाठी काय करावे ?’, हे कळत नव्हते. थोड्याच वेळात श्री. संतोष घरी आले आणि त्यांनी सांगितले, ‘‘तिने मला बोलावले; म्हणून मी आलो.’’ त्यांनी रात्री १० वाजेपर्यंत तिच्याजवळ बसून नामजप केला. तेव्हा ती त्यांच्याकडे कृतज्ञताभावाने पहात होती. ते म्हणाले, ‘‘ती सतत देवाकडे तुमच्यासाठी (आईसाठी) आणि मयुरीसाठी (बहिणीसाठी) प्रार्थना करत असते.’’ (२५.८.२०२०)