देशात को-ऑपरेटिव्ह अधिकोषांच्या घोटाळ्यात महाराष्ट्र अव्वल !

वर्ष २०२०-२१ मध्ये २१७ घोटाळे !

सहकारी अधिकोषांच्या घोटाळ्यांत राज्य आघाडीवर असणे हे लज्जास्पद ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये को-ऑपरेटिव्ह  (सहकारी) अधिकोषांचे (बँकांचे) घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. या घोटाळ्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे.

१. देशभरात १ सहस्र ५३४ नागरी सहकारी बँका आहेत. त्यांपैकी एक तृतीयांश बँका महाराष्ट्रामध्ये आहेत.

२. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालातील आकडेवारीनुसार एकूण वर्ष २०१८ – १९ मध्ये उघडकीस आलेल्या १ सहस्र १९३ घोटाळ्यांपैकी महाराष्ट्रातील घोटाळ्यांची संख्या ८५६ इतकी आहे. वर्ष २०१९-२० मधील एकूण ५६८ घोटाळ्यांपैकी महाराष्ट्रात ३८६ घोटाळे समोर आले आहेत. वर्ष २०२०-२१ मध्ये ३२३ पैकी २१७ घोटाळे महाराष्ट्रात समोर आले आहे.

३. कर्नाटक, गुजरात, केरळ, तमिळनाडू आणि उत्तराखंड येथे सर्वाधिक राजकीय पक्षांचे सहकारी अधिकोष आहेत. त्यापैकी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक यांमध्ये सहकारी अधिकोषाच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. ‘२७७ नागरी सहकारी अधिकोष डबघाईला आले आहेत. १०५ सहकारी अधिकोष किमान आवश्यक भांडवलाची पूर्तता करण्यास असमर्थ आहेत’, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे.

४. भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकोष (बँकिंग) नियमन अधिनियमन दुरुस्तीनुसार सहकारी अधिकोष कह्यात घेण्याचा निर्वाचित संचालकांना पात्रतेच्या आधारावर हटवण्याचा आणि कोणत्याही अधिकार्‍याला हटवण्याचे अधिकार झाला आहे.

५. महाराष्ट्र राज्य सहकारी अधिकोष (बँक) घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी या मासात सात ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या धाडी मुंबई आणि मुंबईच्या बाहेरही टाकण्यात आल्या आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात जे राजकीय नेते अडकले आहेत, त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे नाव सर्वांत पुढे आहे. या प्रकरणात लवकरच अनेक राजकीय नेत्यांना ईडीकडून समन्स जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.