डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची साधकांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांच्या ‘अमृतमय गुरुगाथा’ या ग्रंथमालिकेतील ४ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचे संकलन करतांना डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

डॉ. (सौ.) कुंदा आठवले

१. सौ. अरुणा अजित तावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या लिखाणाची वैशिष्ट्ये

सौ. अरुणा तावडे

‘डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या ‘अमृतमय गुरुगाथा’ या ग्रंथमालिकेच्या लिखाणाच्या धारिका त्यांना संगणकावर दाखवण्याच्या निमित्ताने माझी आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांची भेट झाली. प्रथम मला त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती वाटत होती. नंतर नंतर त्यांच्या सहवासातून त्यांचे अनेक गुण माझ्या लक्षात आले आणि माझी भीती न्यून होऊन मला त्यांची प्रीती अनुभवता आली. ताईंनी मला पुष्कळ प्रेमाने संगणकीय धारिकांतील सर्व सुधारणा आणि त्यांचे विविध अनुभव सांगितले.

१ अ १. ताई एका कागदावर लिखाण लिहून देतात. लिखाणात खाडाखोड जवळजवळ नसतेच.

१ अ २. ताईंच्या लिखाणाचा आरंभ आणि शेवट अगदी अचूक अन् जसा प्रसंग झाला आहे, तसा असतो. लिखाणात सलगता असते.

१ अ ३. ‘नवीन सूत्र कुठे जोडायचे ?’, हे सहजपणे सांगणे : आतापर्यंत ग्रंथमालिकेची पुष्कळ पाने टंकलिखित झाली आहेत. त्या लिखाणात ‘एखादे नवीन सूत्र कुठे जोडायचे’, हे त्या आधीचे सर्व लिखाण तोंडपाठ असल्याप्रमाणे सांगतात. मला याचे पुष्कळ आश्चर्य वाटते.

१ अ ४. स्मरणशक्ती उत्कृष्ट असणे : ताईंची स्मरणशक्ती या वयातही (वय ७९ वर्षे) उत्कृष्ट आहे. त्यांना पूर्वी घडलेल्या सर्व प्रसंगांतील लहान-मोठ्या व्यक्तींची नावे आणि गावे, प्रसंगाचे वर्ष इत्यादी सर्व आठवते.

१ अ ५. लिखाण लक्षपूर्वक वाचून नेमकेपणाने त्रुटी लक्षात आणून देणे : संगणकीय धारिकांतील लिखाणात सुधारणा सुचवल्यावर किंवा त्यातील शंका विचारल्यावर ताई सर्व लिखाण लक्षपूर्वक वाचून मला योग्य त्या सुधारणा सांगतात. जसे परात्पर गुरु डॉ. आठवले नेमकेपणाने लिखाणातील त्रुटी लक्षात आणून देतात, तसेच कुंदाताईही करतात.

१ अ ६. प.पू. भक्तराज महाराज डॉ. (सौ.) कुंदाताईंकडून लिखाण करवून घेत असल्याचे जाणवणे : गुरूंच्या अनुभवलेल्या लीला, गुरूंनी ताईंना घडवणे, विविध प्रसंगांतून ताईंना शिकायला मिळालेली सूत्रे इत्यादींविषयी ताई जेव्हा सांगतात, तेव्हा त्या प्रत्येक प्रसंगात जिवंतपणा जाणवतो. ‘प्रत्यक्ष प.पू. भक्तराज महाराज त्यांच्याकडून लिखाण करवून घेत आहेत’, असे मला जाणवते.

१ अ ७. ताईंची प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्यावर नितांत श्रद्धा आहे अन् ही श्रद्धा त्यांच्या लिखाणात पदोपदी जाणवते.

१ आ. ताईंमध्ये व्यवस्थितपणा, शिस्त, गुरूंचे आज्ञापालन करणे, भाव, प्रीती इत्यादी अनेक गुण आहेत.

१ इ. ताईंनी त्यांचे जीवन साधनेसाठी गुरुचरणी समर्पित केले आहे.

१ ई. डॉ. (सौ.) कुंदाताईंचे जीवन गुरुमय झालेले असणे : ताईंचे गुरु प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज, ताईंच्या जीवनात आलेले अन्य संत इत्यादींविषयी ताई अगदी तल्लीन होऊन सांगतात. त्या सर्वांच्या आठवणीत त्या रमून जातात. ताईंचे जीवन गुरुमयच झाले आहे.

१ उ. डॉ. (सौ.) कुंदाताईंनी त्यांच्या लिखाणातील साधेपणा, निर्मळता इत्यादी सर्व गुरूंमुळे होत असल्याचे सांगणे : एकदा ताईंनी मला विचारले, ‘‘माझे लिखाण कंटाळवाणे वाटत नाही ना ? किंवा अगदी काही निराळे वाटत नाही ना ?’’ तेव्हा मी ताईंना सांगितले, ‘‘नाही ताई. ‘लिखाण वाचतच रहावे’, असे वाटते. लिखाण वाचतांना माझा, तसेच या ग्रंथमालिकेशी संबंधित सेवा करणार्‍या सर्व साधकांचाही भाव जागृत होतो. त्यांनाही पुढचे लिखाण वाचण्याची उत्सुकता असते. लिखाणात साधेपणा, निर्मळता, जिवंतपणा इत्यादी जाणवतो.’’ तेव्हा ताईंनी स्मित हास्य केले आणि त्या म्हणाल्या, ‘‘सर्व काही प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबाच) करतात. आपण काही करत नाही. सर्व प.पू. बाबांची लीला आहे.’’

या सेवेमुळे मला ताईंचा सहवास लाभला आणि त्यांच्यातील गुरुनिष्ठा इत्यादी अनेक गुणांचा माझ्या साधनेसाठी पुष्कळ लाभ झाला. यामुळे मी प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या चरणी शतशः कृतज्ञ आहे. धन्य ते गुरु प.पू. भक्तराज महाराज आणि धन्य ते घडलेले शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले अन् डॉ. (सौ.) कुंदा आठवले !’ (२९.१.२०२१)

डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या समवेत ग्रंथसेवा करतांना आलेल्या अनुभूती

१. ग्रंथसेवा करतांना डॉ. (सौ.) कुंदाताईंचा सहवास आणि प.पू. भक्तराज महाराज यांची आठवण यांमुळे साधिकेला होणारा आध्यात्मिक त्रास न्यून होणे : ‘बर्‍याच वेळा ग्रंथसेवेला आरंभ करण्यापूर्वी मला आध्यात्मिक त्रास व्हायचा, तसेच काही वेळा मनात नकारात्मक विचारही यायचे; पण ताईंसमवेत सेवेला आरंभ केल्यावर मला आध्यात्मिक लाभ होत असल्याचे जाणवायचे. ताईंच्या माध्यमातून प.पू. बाबाच माझा त्रास न्यून करत असल्याचे जाणवायचे आणि माझी भावजागृती व्हायची. दिवसभर प.पू. बाबांच्या आठवणीतच रहाता येत असल्याने एक वेगळाच आनंद मिळायचा.

२. लिखाणाच्या माध्यमातून साधिका प.पू. भक्तराज महाराज यांना अनुभवत असल्याचे जाणवणे : मी प्रत्यक्ष प.पू. बाबांना कधी पाहिले नाही, तरी ताईंच्या लिखाणातून आणि त्या सांगत असलेल्या प्रसंगांतून प.पू. बाबांना अनुभवत असल्याचे जाणवायचे आणि पुष्कळ कृतज्ञता वाटायची.’ (२९.१.२०२१)

२. श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. सागर निंबाळकर

२ अ. डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या लिखाणाची वैशिष्ट्ये

‘डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या ‘अमृतमय गुरुगाथे’तील छायाचित्रांखालील ओळी सिद्ध करण्याची सेवा गुरुकृपेने मला मिळाली. त्या निमित्ताने हे ग्रंथ मला वाचायला मिळाले, यासाठी श्री गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता ! हे ग्रंथ वाचतांना जे अनुभवायला मिळाले आणि डॉ.(सौ.) कुंदाताईंच्या लिखाणाची जी वैशिष्ट्ये लक्षात आली, ती पुढे देत आहे.

२ अ १. वाचकाला प्रेरणा देणारे जिवंत लिखाण ! : या ग्रंथांतील शिष्य डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या साधनेची वाटचाल वाचतांना वाचकासमोर तो संपूर्ण काळ उभा रहातो. ‘प्रत्येक प्रसंगात मी तेथे उपस्थित आहे’, असे मला जाणवते. इतके हे लिखाण जिवंत वाटते. या जिवंतपणामुळे शिष्य डॉ. आठवले आणि डॉ.(सौ.) कुंदाताई यांच्याप्रमाणे साधनेसाठी समर्पित जीवन जगण्याची प्रेरणा जागृत होते.

२ अ २. वाचकाला समरस करणे : डॉ. (सौ.) कुंदाताई यांची साधनेची तळमळ या ग्रंथातून उलगडते. ती तळमळ निर्मळ आणि भावपूर्ण आहे. या वेळी वाचकाला ‘मी त्यांच्या ठिकाणी असतो, तर मलाही हेच वाटले असते’, असे वाटते.

२ अ ३. डॉ. (सौ.) कुंदाताईंची स्मरणशक्ती आणि त्यांचे आंतरिक प्रेम यांचे दर्शन घडणे : डॉ. (सौ.) कुंदाताईंनी या ग्रंथात त्यांच्या ३५ वर्षांच्या साधनाप्रवासात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आणि साधनेसाठी साहाय्य करणार्‍या सनातनच्या लहान-मोठ्या साधकाचा आठवणीने उल्लेख केला आहे. त्यांना त्या प्रत्येकाचे नाव, पद, तसेच ते स्थळ, तो प्रसंग इत्यादी सर्व सुस्पष्ट आठवते, हे विशेष आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या सर्व साधकांविषयी डॉ.(सौ.) कुंदाताईंना जाणवणारे आंतरिक प्रेमही त्यांच्या लिखाणातून प्रतीत होते.

२ अ ४. वाचकाला भक्तीयोगाची दृष्टी देणे

अ. सनातनच्या साधकांना शिष्य डॉ. आठवले यांचे लिखाण वाचण्याची सवय आहे. त्यांचे बहुतांश लिखाण ज्ञानयोगातील बीजरूपात असते. डॉ. (सौ.) कुंदाताईंचे लिखाण हे भक्तीयोगातील आहे. ते वाचकाला ‘भक्तीयोगाची दृष्टी देणारे’ आहे. त्यामुळे ते कृतीत आणण्यास सोपे वाटून वाचक आपसुकच साधनेसाठी प्रवृत्त होतो.

आ. या ग्रंथामुळे वाचकाला प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरुरूप आणि त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र, यांचा ‘भक्तीमय उलगडा’ झाला आहे.

२ अ ५. ‘साधक तथा शिष्य भावा’तील लिखाण !

अ. डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या लिखाणात अतिशयोक्ती नाही. त्यांची अभिमानशून्यताही लिखाणात जाणवते.

आ. सनातन संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेचे प्रसारकार्य वाढेपर्यंत सर्वकाही त्यांनी अनुभवलेले असूनही त्याविषयी त्यांना कोणत्याही प्रकारची आसक्ती आणि कर्तेपणा नाही.

इ. डॉ. (सौ.) कुंदाताईंना सूक्ष्मातील कळत असले, तरी त्याविषयीही त्यांना विशेष काही वाटत नाही.

ई. शिष्य डॉ. आठवले यांच्यासारख्या महान विभूतीसह साधना करतांना ‘त्यांची पत्नी’ म्हणून लिखाणात आणि प्रत्यक्ष जीवनातही डॉ. (सौ.) कुंदाताईंनी स्वतःचे वेगळेपण मुळीच जपलेले नाही.

एकूणच ‘डॉ. (सौ.) कुंदाताईंचे संपूर्ण लिखाण ‘एक साधक, तथा एक शिष्य’ याच भावातील आहे’, हे प्रकर्षाने जाणवते.

२ अ ६. गुरु-शिष्य नात्यातील अद्भुत पैलूंचे दर्शन ! : ‘गुरुसेवा करतांना भाव कसा असावा ? गुरूंवरील निष्ठा कशी असावी ? गुरु-शिष्य नात्यातील आनंद कसा मिळवावा ? साधनेत मनोलय आणि बुद्धीलय करायचा असतो; पण आवश्यक तेव्हा मन आणि बुद्धी यांचा सुयोग्य वापर कसा करावा ?’, यांसारखे साधनेचे आणि गुरु-शिष्य नात्याचे अनेक अद्भुत पैलू या लिखाणातून वाचकमनावर बिंबतात. त्यामुळे ही ‘अमृतमय गुरुगाथा’ साधनेचा आणि शिष्यत्वाचा अमृतकुंभ ठरते !

२ अ ७. खर्‍या संतत्वाची ओळख करून देणे : शिष्य डॉ. आठवले यांनी आजवर समाजातील अनेक खरे संत ओळखले. त्यांनी समाजाला त्या संतांची ओळखही करून दिली; मात्र या गुरुगाथेतून ‘खरे संतत्व, खरे शिष्यत्व’ यांची अत्यंत जवळून ओळख होते.

२ अ ८. साधनेला प्रवृत्त करणार्‍या अनुभूती ! : ग्रंथांतील प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयीच्या अनुभूती वाचतांना ‘त्या आपणही अनुभवत आहोत’, असे वाटते. या अनुभूती प्रचलित संतचरित्रांतील चमत्कारांप्रमाणे वाचकाला संतांच्या चमत्काराच्या प्रेमात पाडत नाहीत, तर संतांच्या प्रीतीची अनुभूती देऊन त्याला ‘साधकत्व ते शिष्यत्व’ असा प्रवास करण्यासाठी मार्गदर्शक ठरतात.

२ आ. ‘पूज्य’ वा अन्य प्रचलित उपाध्यांच्या पलीकडे गेलेल्या शिष्या डॉ. (सौ.) कुंदाताई ! : क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर याला ‘भारतरत्न’ हा सन्मान मिळाला आहे; मात्र त्या पुरस्काराचा परिणाम म्हणून ‘जनमानसामधील सचिनविषयीची आत्मीयता वाढली वा न्यून झाली’, असे झाले नाही. त्याला ‘भारतरत्न’ म्हणून कुणी संबोधितही नाही; कारण सचिनसारखी मंडळी उपाधीच्या पलीकडे गेलेली असतात. तसेच हे लिखाण वाचल्यानंतर ‘डॉ. (सौ.) कुंदाताई’ या ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या शिष्य’ म्हणून आपल्याला अधिक जवळच्या वाटतात, भावतात आणि लक्षातही रहातात. त्यांच्याप्रतीचा ‘आपलेपणा’चा भाव वाचकाच्या अंतरी भक्तीचा ओलावा निर्माण करतो. यावरून डॉ. (सौ.) कुंदाताई ‘पूज्य’ किंवा एरव्ही संतांच्या नावामागे लावण्यात येणार्‍या उपाध्यांच्या पलीकडे गेल्याचे लक्षात येते.

श्री गुरूंच्या कृपेनेच ही सूत्रे लिहून पूर्ण झाली. त्यासाठी श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’ (२९.१.२०२१)

३. कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. रूपाली कुलकर्णी

‘डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या ‘अमृतमय गुरुगाथा’ या ग्रंथमालिकेच्या संगणकीय धारिका त्यांना (सौ. कुंदाताईंना) अंतिम वाचण्यासाठी संगणकावर दाखवण्याची सेवा मला मिळाली. त्या वेळी मला त्यांच्या सहवासात शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

३ अ. डॉ. (सौ.) कुंदाताईंनी स्वतःच्या परिचयात स्वतःच्या शिक्षणाचा किंवा इतर क्षेत्रांतील कर्तृत्वाचा उल्लेख न करणे : ‘सौ. कुंदाताई डॉक्टर आहेत’, एवढेच मला ठाऊक होते. त्यांनी ‘अमृतमय गुरुगाथा’ या ग्रंथमालिकेतील चारही ग्रंथांत दिलेल्या स्वतःच्या परिचयात स्वतःच्या शिक्षणाचा किंवा इतर क्षेत्रांतील कर्तृत्वाचा उल्लेख केलेला नाही. सौ. कुंदाताईंनी ग्रंथमालिकेसाठी लिहिलेल्या ‘मनोगता’त म्हटले आहे, ‘माझी ओळख ‘प.पू. भक्तराज महाराज यांची अनुग्रहित आणि प.पू. रामानंद महाराज यांची कृपांकित’, अशीच करून द्यावी. मला त्यात पुष्कळ समाधान वाटेल.’

३ आ. ताईंनी प.पू. बाबांचे आज्ञापालन करून त्यांचे मन जिंकले. त्यामुळे २५ ते ३० वर्षांपूर्वीचा सर्व घटनाक्रम त्या जसाच्या तसा आठवू आणि लिहू शकतात. ही त्यांच्यावर गुरुकृपाच आहे.

३ इ. डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या बोलण्यात केवळ प.पू. भक्तराज महाराज यांचाच विषय असणे : सौ. कुंदाताईंनी ‘अमृतमय गुरुगाथे’च्या पाचव्या खंडात घेण्यासाठी प.पू. पट्टेकर महाराज यांच्याविषयी लिहून दिले. त्यात त्यांनी लिहिले आहे – ‘माझी अध्यात्माची वाटचाल चालू होण्यापूर्वी भारतात पदवीपर्यंतचे वैद्यकीय शिक्षण घेणे, रुग्णालयात नोकरी करणे, इंग्लंडला जाणे, इंग्लंडमधील ‘ऑक्सफर्ड’ सारख्या नावाजलेल्या विद्यापिठात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणे, तसेच तेथील रुग्णालयात रजिस्ट्रार पदावर नोकरी करणे’, असे माझे जीवन होते.’ ते वाचून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. मी सौ. कुंदाताईंच्या समवेत ३ मास सेवा करत आहे. या काळात त्यांनी कधीही ‘मी विदेशात नोकरी करत होते’, असे सांगितले नाही. त्यांच्या बोलण्यात आणि मनात प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) अन् केवळ प.पू. बाबाच असतात.

३ ई. डॉ. (सौ.) कुंदाताईंनी स्वतःच्या करून दिलेल्या ओळखीमुळे साधिकेची झालेली विचारप्रक्रिया : त्यांनी ‘प.पू. भक्तराज महाराज यांची अनुग्रहित आणि प.पू. रामानंद महाराज यांची कृपांकित’ या स्वतःच्या करून दिलेल्या ओळखीमुळे मी फारच प्रभावित झाले. मलाही वाटले, ‘माझी खरी ओळख काय असायला हवी ?’, माझी खरी ओळख ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली साधना करते’, एवढीच असायला हवी. ‘गुरूंचा शिष्य’, हीच साधकाची खरी ओळख असते.

सौ. कुंदाताई यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे; पण ते लिहून देण्यासाठीच्या माझ्या शब्दांना मर्यादा आहेत. अध्यात्मात ‘खरे शिकणे शब्दातीत (शब्दाच्या पलीकडील) असते’, असे मी ऐकले आहे. त्यानुसार ‘त्यांच्यातील विविध गुण मला आत्मसात करता येऊ देत’, हीच प.पू. बाबांच्या चरणी प्रार्थना !’ (१४.९.२०२१)

४. कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. तृप्ती कुलकर्णी

४ अ. डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या लिखाणाचे संकलन करतांना नकळतपणे हात जोडले जाणे : ‘डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या ‘अमृतमय गुरुगाथा’ या ग्रंथमालिकेच्या पाचव्या खंडाच्या लिखाणाचे ग्रंथाच्या दृष्टीने संकलन करणे, ग्रंथाची अनुक्रमणिका करणे इत्यादी सेवा करण्याची संधी मला मिळाली. सौ. कुंदाताई तीर्थस्थानी गेल्यावर त्यांना आलेल्या विविध अनुभूती, त्यांना लाभलेला संतसहवास इत्यादी प्रसंग वाचतांना त्यांच्या लिखाणाच्या ओघवत्या शैलीमुळे मी भान हरपून वाचत रहायचे. त्यामुळे कधीकधी ‘संकलन करायचे आहे’, हेच मी विसरून जात होते. त्यांचे लिखाण वाचतांना माझ्या मनात ‘दिव्यत्वाची जेथे प्रचीती । तेथे कर माझे जुळती ।’, ही एका कवितेतील ओळ उमटून नकळतपणे माझे हात जोडले गेले.’

(१४.९.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक