महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

गेल्या काही दिवसांपासून एकामागोमाग उघड होणार्‍या महिलांवरील अत्याचारांच्या घटना पाहिल्यास समाजात कायद्याचे भय उरलेले नाही, हेच स्पष्ट होते. बलात्कार करणार्‍यांना फाशीसारखे कठोर शासन केले, तरच अशा घटना थांबतील ! – संपादक

सातारा, २४ सप्टेंबर – महाबळेश्वर येथे एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्यानंतर ती गर्भवती राहिल्याने तिची घरातच प्रसुती करून प्रकरण दडपण्यासाठी जन्मलेले बाळ मुंबईत दत्तक दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे या प्रमुख आरोपींसह हे प्रकरण मिटवण्यासाठी साहाय्य करणारे ९ जण, अशा एकूण ११ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपींमध्ये महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डी.एम्. बावळेकर यांची मुले, योगेश आणि सात्त्विक यांचा समावेश आहे.

१. पीडित अल्पवयीन मुलगी महाबळेश्वर येथे मोलमजुरी करून स्वतःचा चरितार्थ चालवते. सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे यांनी मुलीवर अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती राहिली. काही दिवसांपूर्वी तिची घरातच प्रसुती करण्यात आली. तिने एका मुलीला जन्म दिला.

२. या प्रकरणाची कुठेही वाच्यता होणार नाही, याची काळजी घेत संशयितांनी मुलीला मुंबई येथे दत्तक दिले.

३. संशयितांनी अत्याचारग्रस्त मुलगी आणि तिचे कुटुंबीय यांना तक्रार प्रविष्ट न करण्यासाठी धमक्या दिल्या. त्यामुळे पीडीत मुलगी तक्रार करण्यास पुढे येत नव्हती. अंततः वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी पीडित मुलीला विश्वासात घेतले. यानंतर पोलिसांनी अन्वेषण चालू केले. त्यानंतर हा प्रकार समोर आला.