सेवेची तळमळ असलेल्या आणि साधनेमुळे यजमानांच्या मृत्यूनंतरही स्थिर रहाणार्‍या जळगाव सेवाकेंद्रातील श्रीमती विजया धनराज विभांडिक !

सेवेची तळमळ असलेल्या आणि साधनेमुळे यजमानांच्या मृत्यूनंतरही स्थिर रहाणार्‍या जळगाव सेवाकेंद्रातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजया धनराज विभांडिक (वय ५३ वर्षे) !

मूळच्या धुळे जिल्ह्यातील साधिका श्रीमती विजया धनराज विभांडिक यांनी खामगाव, तसेच नगर येथे राहून काही वर्षे प्रसारातील सेवा केली. मागील ८ मासांपासून त्या जळगाव येथील सेवाकेंद्रात राहून सेवा करत आहेत. आज भाद्रपद कृष्ण पक्ष तृतीया (२४.९.२०२१) या दिवशी त्यांचा ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कन्या  कु. सोनल विभांडिक आणि सौ. अश्विनी साळुंके यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती विजया विभांडिक

श्रीमती विजया धनराज विभांडिक  यांना ५३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कु. सोनल विभांडिक (श्रीमती विजया  विभांडिक यांची मोठी कन्या), जळगाव सेवाकेंद्र   

१. वेळेचे योग्य नियोजन करणे

कु. सोनल विभांडिक

‘आईला पूर्वी प्रसारातील सेवा करतांना ‘बस’ने किंवा ‘रेल्वे’ने प्रवास करून सेवेच्या ठिकाणी जावे लागायचे. त्या वेळी आई स्थानकावर नियोजित वेळेच्या आधी अर्धा घंटा जाऊन थांबायची आणि तेथे बसून जिज्ञासू, तसेच नवीन साधक यांना भ्रमणभाषवरून संपर्क करण्याची सेवा करायची. ती प्रत्येक ठिकाणी सेवेला अगदी वेळेत पोचत असे.

२. सेवाकेंद्रात रहातांना आईने सर्व  कार्यपद्धती शिकून त्या आचरणात आणणे

मागील ८ मासांपासून आई जळगाव येथील सेवाकेंद्रात रहायला आली आहे. येथे आल्यावर तिने येथील सर्व कार्यपद्धती शिकून घेतल्या आणि त्या आचरणातही आणल्या. त्यामुळे तिला पुष्कळ आनंद मिळाला.

३. संगणक शिकण्याची तळमळ असल्याने  आईने ३ – ४ दिवसांत टंकलेखन करायला शिकणे

कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी चालू झाली आणि आईचे बाहेर जाऊन सेवा करणे बंद झाले. त्या वेळी आईने संगणक शिकण्याची इच्छा व्यक्त केली. संगणक शिकण्याच्या तळमळीने आई तिच्या अन्य सेवा पूर्ण करून संगणक शिकण्यासाठी प्रतिदिन १ घंटा वेळ देऊ लागली आणि अवघ्या ३ – ४ दिवसांत तिने टंकलेखन शिकून घेतले.

४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

आई दिवसभराचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न पूर्ण होण्यासाठी नियोजन करते. एक सेवा पूर्ण झाली की, दुसरी सेवा करण्याआधी ती नामजप आणि स्वयंसूचनेचे सत्र करते. ‘सेवेमुळे व्यष्टी साधनेचे प्रयत्न झाले नाहीत’, असे व्हायला नको’, अशी आईला तळमळ असते.

५. इतरांचा विचार करणे

आई तिला दिलेली प्रत्येक सेवा परिपूर्ण करते. ‘सेवा करतांना सहसाधकांना काही अडचण यायला नको. त्यांना सेवा सहजतेने करता आली पाहिजे’, असा तिचा दृष्टीकोन असतो.

६. सेवेची तळमळ

आईला गुडघेदुखीचा तीव्र त्रास आहे, तसेच तिच्या पायांना पुष्कळ सूज येते; पण तशा स्थितीतही तिला कोणतीही सेवा दिल्यास ती आनंदाने करते. ‘अल्प कालावधीत अधिक आणि चांगली सेवा कशी करता येईल ?’, अशी तिला तळमळ असते. ती पुष्कळ एकाग्र होऊन सेवा करते.’ (१८.९.२०२१)

सौ. अश्विनी साळुंके (श्रीमती विजया  विभांडिक यांची धाकटी कन्या), फोंडा, गोवा.

१. उत्साही आणि कृतीशील

सौ. अश्विनी साळुंके

‘आई आमच्या घरी गोवा येथे आल्यावर सतत कार्यरत असते. तिला वेळ वाया गेलेला आवडत नाही. खरे पहाता तिची शारीरिक स्थिती विशेष चांगली नाही. असे असूनही ती म्हणते, ‘‘मला नेहमी उत्साही वाटते आणि त्यामुळे माझ्याकडून सर्व कामे आपोआप होतात.’’ आई माझ्या समवेत असतांना मलाही उत्साह वाटतो.

२. काटकसरीपणा

आई कोणतीच गोष्ट वाया जाऊ देत नाही. ती प्रत्येक वस्तूंचा पुरेपूर वापर करते.

३. परिस्थिती स्वीकारणे

आई सतत वर्तमानकाळात रहाते. एखादा प्रसंग घडल्यानंतर ‘यातून देवाला मला काय शिकवायचे आहे ?’, असा तिचा नेहमी विचार असतो. त्यामुळे ती प्रत्येक परिस्थिती स्वीकारून स्थिर रहाते.

४. वडिलांच्या निधनानंतर आईमधील स्थिरतेचे दर्शन होऊन ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच आई कठीण प्रसंगातून सावरली आहे’, याची जाणीव होणे

वर्ष २०२० मध्ये माझ्या वडिलांचे, धनराज विभांडिक यांचे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) नगर येथे निधन झाले. त्या वेळी माझे बाळ लहान असल्याने आणि दळणवळण बंदी असल्यामुळे मी नगरला जाऊ शकले नाही. वडिलांच्या निधनानंतर मी आईशी भ्रमणभाषवरून बोलत असतांना ‘ती एकदम स्थिर आहे’, असे माझ्या लक्षात आले.

नंतर ७ – ८ मासांनी आई आमच्याकडे गोव्याला आली. बाबा गेल्यानंतर माझी आणि तिची प्रथमच भेट होत होती. त्यामुळे ‘तिला कसे सामोरे जायचे ?’, असे मला वाटत होते; पण आईला पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. तिने स्वतःला पुष्कळ सावरले होते. आईने मला एकदाही ‘तिने काय काय सहन केले ? किंवा तिला कोणते त्रास झाले ?’, याची जाणीव होऊ दिली नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची आईवर भरभरून कृपा आहे आणि केवळ त्यांच्याच कृपेमुळे ‘मी आईला अशा स्थिर स्थितीत पाहू शकत आहे’, याची मला जाणीव झाली.

कृतज्ञता : आईविषयी लिहायला मी पुष्कळ अल्प पडत आहे. ‘भगवंता, आई हे तुझेच रूप आहे. मी कधीच आईची उतराई होऊ शकत नाही. अशा आईच्या पोटी तू मला जन्म दिलास, यासाठी मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’

(१८.९.२०२१)