अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरोधातील मानहानीचे प्रकरण
मुंबई – माझा दंडाधिकारी न्यायालयावर विश्वास राहिलेला नाही. हे पक्षपाती आहे. न्यायालयाने मला अप्रत्यक्षरित्या धमकी दिली आहे. माझ्याविरुद्धचे प्रकरण जामीनपात्र आहे. तरीही मी उपस्थित राहिले नाही, तर ‘वॉरंट’ जारी करू’, असे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी येथे आले आहे, असे विधान अभिनेत्री कंगना राणावत यांनी येथे केले. २० सप्टेंबर या दिवशी प्रथमच मानहानीप्रकरणी येथील दंडाधिकारी न्यायालयासमोर (‘मॅजिस्ट्रेट कोर्ट’) उपस्थित झाल्या. त्या वेळी त्या बोलत होत्या.
राणावत यांचे अधिवक्ता रिझवान सिद्दिकी यांनी न्यायालयात सांगितले की, आमच्या अशिलास या न्यायालयात प्रकरण पुढे चालू ठेवायचे नाही. आम्ही ‘चिफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट’च्या न्यायालयात अर्ज केला आहे. त्यात हे प्रकरण दुसर्या न्यायालयाकडे वर्ग करण्याची विनंती केली आहे. आम्हीही गीतकार जावेद अख्तर यांच्याविरुद्ध खटला प्रविष्ट केला आहे. त्यात त्यांच्यावर ‘खंडणी मागणे आणि धमकी देणे आहे’, असे आरोप केले आहेत. कंगनाविरुद्ध जावेद अख्तर यांनी अब्रूहानीचा दावा प्रविष्ट केला आहे.
काय आहे प्रकरण ?
अभिनेता सुशांतसिंह राजपूत खटल्यानंतर वृत्तवाहिन्यांवर मुलाखत देतांना अभिनेत्री कंगना राणावत यांनी गीतकार जावेद अख्तर यांच्यावर अनेक आरोप केले होते. नोव्हेंबर २०२० मध्ये जावेद यांनी कंगना यांच्याविरुद्ध दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला प्रविष्ट केला होता. न्यायालयाने १ मार्च या दिवशी कंगना यांच्याविरुद्ध जामीनपात्र ‘वॉरंट’ लागू केले होते, तसेच २५ मार्च या दिवशी त्यांना जामीन मिळाला होता.