मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डी.जी.सी.ए.) प्रवासी वाहतुकीला अनुमती दिल्याने या विमानतळावरून प्रवासी विमानांचे उड्डाण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आय.आर्.बी. आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी दिली. सामंजस्य करारानुसार ९० वर्षे हे विमानतळ आय.आर्.बी.च्या कह्यात रहाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चिपी येथे आय.आर्.बी. सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा.लि. आस्थापनाने ८०० कोटी रुपये व्यय करून हे विमानतळ विकसित केले आहे. हे पहिले ग्रीनफील्ड विमानतळ आहे. कोकण आता मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिणेकडील राज्ये, तसेच देशाच्या अन्य भागांशीही हवाई मार्गाने जोडले गेल्याने प्रवासी आणि मालवाहतूक यांसाठी याचा लाभ होणार आहे. या विमानतळाचे यापूर्वी उद्घाटन झाले असले, तरी या विमानतळावरून विमानांचे उड्डाण होऊ शकले नव्हते.