पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका श्रीमती अरुणा अशोक मोहिते यांच्यातील प्रेमभावामुळे पुण्यातील अनेक साधिकांच्या त्या ‘आध्यात्मिक मैत्रीण’ बनल्या होत्या. त्यांच्याविषयी सातारा रस्ता, पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक स्तर ६८ टक्के), सौ. अनुराधा तागडे (आध्यात्मिक स्तर ६६ टक्के) आणि सौ. प्रतिभा फलफले
१. सेवेची तीव्र तळमळ असणे
१ अ. वर्ष २००४ पासून अनेक प्रकारच्या सेवा मनापासून करणे : ‘मोहितेकाकूंना सेवेची पुष्कळ तळमळ होती. वर्ष २००४ पासून काकूंनी सत्संग घेणे, सत्संगातील जिज्ञासूंना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे, विज्ञापने मिळवणे, विज्ञापनांच्या अहवालाची सेवा करणे आणि ग्रंथप्रदर्शन लावणे अशा अनेक सेवा मनापासून केल्या.
१ आ. दळणवळण बंदीच्या काळातही काकूंनी विविध सेवा करणे : दळणवळण बंदीच्या काळातही काकूंनी ‘ऑनलाईन’ सत्संगांची लिंक पाठवणे, नातेवाइकांना साधना सत्संगाला जोडून ठेवणे, वाचक आणि जिज्ञासू यांना भ्रमणभाषवरून संपर्क करणे, अशा विविध सेवा केल्या.
१ इ. आजारपणाची तीव्रता वाढली असतांनाही काकूंची सेवा करण्याची धडपड ! : वर्ष २०२१ मधील गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या काळात काकूंच्या आजारपणाची तीव्रता वाढली होती. असे असतांनाही जिज्ञासूंना भ्रमणभाषवरून संपर्क करण्याची सेवा करण्याचा त्या प्रयत्न करत होत्या.
सौ. अर्चना चांदोरकर
काकूंवर ‘केमोथेरपी’चे उपचार चालू असतांनाही त्या ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवेसाठी येणे : ‘वर्ष २०२० मध्ये काकूंवर ‘केमोथेरपी’चे उपचार चालू होते. तेव्हाही त्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने लावलेल्या ग्रंथप्रदर्शन कक्षावर काही वेळ सेवेसाठी आल्या होत्या. तेव्हा त्या हसतमुख होत्या. आजारपणाविषयी त्यांचे कोणतेच गार्हाणे नव्हते.’
श्रीमती माधवी गोरे (आध्यात्मिक स्तर ६८ टक्के)
१. ‘आध्यात्मिक मैत्रिणी’ या नात्याने मोहितेकाकूंशी मोकळेपणाने बोलता येणे : ‘मागील २० वर्षांपासून मला मोहितेकाकूंच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या माझी ‘आध्यात्मिक मैत्रीण’ होत्या. आम्ही दोघी एकमेकींशी मोकळेपणाने बोलायचो. ‘प्रत्येक प्रसंगात आपली साधना काय आहे ?, प.पू. गुरुदेवांना काय आवडेल ?’, याविषयी आमचे बोलणे होत असे.
२. रुग्णालयात असतांनाही व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत सातत्य राखणार्या मोहितेकाकू ! : मोहितेकाकूंना अधूनमधून रुग्णालयात भरती व्हावे लागायचे, तरीही त्या व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न पूर्ण करून नियमित आढावा द्यायच्या. आढाव्यात त्या स्वतःच्या चुका प्रांजळपणे सांगायच्या. त्यांच्या आढाव्यातून इतर साधकांना शिकायला मिळत असे.
३. सेवेत अडचण येऊ नये, यासाठी मोहितेकाकूंनी देवाला तळमळीने प्रार्थना करणे : सेवेच्या संदर्भात एखादे सूत्र, उदा. प्रवचने ठरवणे, विज्ञापने घेणे, यांविषयी समजल्यानंतर ‘स्वतःला काय काय करता येईल ?’, असा विचार करून मोहितेकाकू तळमळीने प्रयत्न करायच्या. आजारामुळे काही अडचण येऊ नये आणि सेवेत सहभागी होता यावे, यासाठी त्या देवाला तळमळीने प्रार्थना करायच्या.
४. काकूंची परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा होती. काकू सांगायच्या, ‘‘रुग्णालयात असतांना ‘गुरुदेव सोबत आहेत’, असे मी अनेक वेळा अनुभवले आहे.’’
श्री. विलास पाटील (आध्यात्मिक स्तर ६३ टक्के) आणि सौ. नीता विलास पाटील (आध्यात्मिक स्तर ६६ टक्के)
१. मोहितेकाकूंमुळे सनातन संस्थेची ओळख होणे : ‘२० वर्षांपूर्वी मोहितेकाकूंमुळे आम्हाला सनातन संस्थेची ओळख झाली. तेव्हा त्या आणि आम्ही ‘एस्.टी. कॉलनी’मध्ये रहात होतो. त्या आमच्या घरी येऊन ‘आमची साधना आणि नामजप कसा होत आहे’, याविषयी सातत्याने विचारपूस करायच्या. नंतर त्यांनी आमच्या घरी सत्संग चालू केला. त्यामुळे आमचा साधनेचा पाया चांगला झाला.
२. काकूंनी ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे आणि बालसंस्कारवर्ग चालू करणे : आमच्या भागात काकूंनी ‘सनातन प्रभात’चे अनेक वर्गणीदार केले होते. त्या सर्वांना त्यांनी जोडूनही ठेवले होते. तेथे त्यांनी पू. कै. (सौ.) पाळंदेकाकू यांच्यासह बालसंस्कारवर्गही चालू केला होता. अनेक लहान मुलांना त्याचा लाभ झाला.
३. ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्व काळजी घेतील’, या श्रद्धेने काकूंनी स्वतःच्या दुर्धर आजाराकडे ‘प्रारब्ध’ म्हणून पहाणे : काही दिवसांनंतर काकू बिबवेवाडी येथे रहायला गेल्या. तरीसुद्धा त्यांनी आमच्याशी सातत्याने संपर्क ठेवला होता. त्यांच्यामुळेच आम्ही साधनेत घडत गेलो. जानेवारी २०२० मध्ये एकदा आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ‘त्या आजारी आहेत किंवा त्यांना काही त्रास होत आहे’, असे मुळीच वाटत नव्हते. त्या आनंदी वाटत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेव काळजी घेतीलच. हे आपले प्रारब्ध आहे आणि ते सर्व भोगून संपवायचे आहे.’’
सौ. संगीता प्रमोद घोळे (आध्यात्मिक स्तर ६१ टक्के) आणि श्री. प्रमोद घोळे
तत्परतेने सेवा करणे : ‘मोहितेकाकू विज्ञापने आणण्याची सेवा तत्परतेने करायच्या. त्यांच्या बोलण्यात सहजता आणि मोकळेपणा जाणवायचा, तसेच त्यांचा ‘अहं अत्यल्प आहे’, असे वाटायचे.’
सौ. नीलांबरी ओझरकर
१. काकूंकडून अनेक गोष्टी शिकायला मिळणे : ‘मोहितेकाकू माझी ‘आध्यात्मिक मैत्रीण’ होत्या. ‘भावपूर्ण सेवा कशी करावी ?, सकारात्मक कसे रहावे’ ?, हे मी त्यांच्याकडून शिकले.
२. परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव असणे : ‘सेवेच्या माध्यमातून प.पू. गुरुदेव चैतन्य देत आहेत’, असा काकूंचा भाव होता. ‘‘मी काहीच सेवा करत नाही, तरी देव मला भरभरून देतो. त्याच्या चरणी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे’’, असे त्या म्हणायच्या.’
सौ. प्रतिभा फलफले
१. संतांनी कर्करोगासाठी दिलेल्या उपायांविषयी काकूंना कृतज्ञता वाटणे : ‘वर्ष २०१९ मध्ये काकूंना कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्या वेळोवेळी आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारून घेत आणि ते उपाय श्रद्धेने पूर्ण करत. संतांनी दिलेल्या उपायांबद्दल काकूंना पुष्कळ कृतज्ञता वाटत असे.
२. गंभीर आजारातही सकारात्मक असणे : काकूंना कर्करोगासारखा गंभीर आजार होऊनही ‘गुरुदेवांच्या कृपेने मी छान आहे’, असे त्या सांगायच्या. त्यांच्या बोलण्यात कधीही निराशा नसे.
३. भावावस्थेत रहाण्यासाठी सतत प्रयत्न करणे
अ. त्या सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात रहात असत. प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवसभरातील चुका आणि साधनेचे प्रयत्न यांविषयी गुरुदेवांना आत्मनिवेदन करत.
आ. साधक काकूंना भेटायला गेल्यानंतर ‘साधकांच्या माध्यमातून गुरुदेवच मला भेटायला आले आहेत’, असा त्यांचा भाव असायचा.
काकूंमध्ये गुरुदेवांप्रती असलेल्या भावामुळे भ्रमणभाषवरून त्यांच्याशी बोलतांना गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता यायचे.
४. शेवटच्या दिवसांत ‘काकू सगळ्यांतून अलिप्त झाल्या असून त्यांना साधक आणि कुटुंबीय यांच्याकडून कोणत्याच अपेक्षा नाहीत’, असे मला जाणवत होते.’
सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक स्तर ६८ टक्के)
१. काकूंना हिंदु राष्ट्र पहाण्याची तीव्र तळमळ असणे : ‘जिल्ह्यात होणार्या ऑनलाईन सत्संगांना काकू नियमित उपस्थित रहायच्या. सत्संगात सांगितलेल्या सूत्रांनुसार त्या प्रामाणिकपणे प्रयत्नही करायच्या. भ्रमणभाषवर काकूंशी माझे शेवटचे बोलणे झाले. त्या वेळेला त्या एकच वाक्य सारखे म्हणत होत्या, ‘‘ताई, मला हिंदु राष्ट्र पहायचे आहे आणि हिंदु राष्ट्रात सेवा करायची आहे.’’ काकूंना अगदी शेवटपर्यंत साधनेची तीव्र तळमळ होती.
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या माध्यमातून ‘गुरुदेव स्वतःच्या जवळच आहेत आणि त्यांचे लक्ष आहे’, असे सांगणार्या मोहितेकाकू ! : काकूंना आजारपणात पुष्कळ त्रास होत होता. त्या स्थितीतही त्या पुष्कळ आनंदी आणि गुरुदेवांच्या अनुसंधानात होत्या. काही मासांपासून मीसुद्धा रुग्णाईत आहे. माझ्याजवळ नेहमी परम पूज्य गुरुमाऊलींचा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ असतो. मोहिते काकूंजवळही हा ग्रंथ ठेवलेला असायचा. काकू मला म्हणायच्या, ‘‘आपल्या दोघींच्या जवळ परम पूज्य गुरुदेव आहेत. गुरुदेवांचे किती लक्ष आहे.’’ या माध्यमातून ‘परात्पर गुरु डॉक्टर जणू स्थुलातून आम्हा दोघींकडे पहात आहेत’, असा त्यांचा भाव असायचा.
३. ‘परात्पर गुरु डॉक्टर’ हेच काकूंचे जग असल्याने ‘गुरुदेवांना आवडेल’, अशी साधना करण्याची त्यांना तळमळ असणे : मोहितेकाकूंनी शेवटपर्यंत श्रद्धेने आणि तळमळीने साधनेसाठी प्रयत्न केले. शेवटच्या २ मासांत आजारपणामुळे त्यांच्या शारीरिक त्रासांत वाढ झाली होती. त्यामुळे त्यांना झोपून रहावे लागायचे. ‘त्या स्थितीतही त्या सतत नामजप, प्रार्थना करणे, गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाणे’, आदी साधनेचे प्रयत्न तळमळीने करायच्या. ‘प.पू. गुरुदेव’ हेच त्यांचे जग होते. त्या नेहमी म्हणायच्या, ‘‘माझा देव (परात्पर गुरु डॉक्टर) माझ्यासाठी पुष्कळ करत आहे. मला केवळ माझा देवच (गुरुदेवच) हवा आहे आणि मला ‘देवाला आवडेल’, अशी साधना करायची आहे.’’
परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव आणि सेवेची तीव्र तळमळ असलेल्या मोहितेकाकूंच्या सहवासात आम्हाला शिकण्याची संधी मिळाली. त्याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
(या लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १६.९.२०२१)