उत्साही, सकारात्मक आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील कै. (श्रीमती) अरुणा अशोक मोहिते (वय ७० वर्षे) !
पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका श्रीमती अरुणा अशोक मोहिते (वय ७० वर्षे) यांचे १०.९.२०२१ या दिवशी कर्करोगाने निधन झाले. २२.९.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यांच्या आजाराची पार्श्वभूमी, तसेच त्यांच्याविषयी त्यांचा मुलगा आणि मुलगी यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. श्रीमती अरुणा मोहिते यांच्या आजाराची पार्श्वभूमी !
४.१०.२०१९ या दिवशी श्रीमती अरुणा मोहिते यांना स्त्रीबीजकोषाचा (ओव्हरीचा) कर्करोग झाल्याचे निदान झाले. ७.११.२०१९ या दिवशी सह्याद्री हॉस्पिटल, बिबवेवाडी, पुणे येथे शस्त्रकर्म करून त्यांचे गर्भाशय आणि स्त्रीबीजकोष काढले होते. त्यानंतर दीड वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्यावर २० ते २५ वेळा ‘केमोथेरपी’चे उपचार करण्यात आले. ७.९.२०२१ या दिवशी त्यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने सह्याद्री रुग्णालयामध्ये भरती केले होते. शुक्रवार, १०.९.२०२१ या दिवशी रात्री ८.३५ वाजता त्यांचे रुग्णालयातच निधन झाले.
२. कै. (श्रीमती) अरुणा अशोक मोहिते यांचे पुत्र श्री. अमेय मोहिते, पुणे यांना जाणवलेली आईची गुणवैशिष्ट्ये !
२ अ. करारी, तेजस्वी आणि निडर स्वभाव : ‘आमची आई करारी, तेजस्वी आणि निडर स्वभावाची होती. तिच्यातील हे गुण आम्हाला नेहमीच तिच्याविषयी आदर निर्माण करणारे ठरले.
२ आ. उत्साही आणि सकारात्मक असणे : मी आईला कधी ‘ती थकलेली, दमलेली किंवा निराश झालेली आहे’, असे बघितले नाही. ती नेहमीच सकारात्मक आणि कोणत्याही कार्यासाठी तत्पर असायची. योग्य कृती करण्यासाठी ती कधीच घाबरली नाही.
२ इ. ‘प्रेमभाव’ या गुणामुळे आई सर्व नातेवाईक आणि साधक यांची लाडकी होती.
२ ई. परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा असल्याने आईने तन, मन आणि धन अर्पून सेवा करणे : आईची परात्पर गुरु डॉक्टरांवर असलेली श्रद्धा आणि ईश्वरी राज्य यावे अन् ते बघता यावे, याची तिला असणारी तळमळ या सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या. प्रसारामध्ये तन, मन आणि धन अर्पण करून झोकून देऊन सेवा करणे, हे तिने शेवटपर्यंत सोडले नाही.
२ उ. दळणवळण बंदी आणि आजारपण असतांनाही चिकाटीने साधनेचे प्रयत्न करणारी अन् परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी साधिका होण्यासाठी धडपडणारी आई ! : दळणवळण बंदी आणि आजारपण असतांनाही आई तिच्या साधनेचा नित्य दिनक्रम कधीच चुकवायची नाही. तिचे ‘सातत्य’, ‘चिकाटी’ आणि ‘नियमितपणा’ हे गुण माझ्यासाठी आयुष्यभर प्रेरणादायी आहेत. ती सतत स्वतःमधले स्वभावदोष शोधण्याचा प्रयत्न करायची. कितीही त्रास झाला, तरी ती स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवायची. स्वतःला पालटण्यासाठी आणि परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी साधिका होण्यासाठीची तिची धडपड आम्हा सर्वांसाठी आदर्शवत् आहे.
आईने आमच्यावर केलेल्या संस्कारांची शिदोरी आमच्या समवेत नेहमीच राहील ! संसार आणि साधना यांचा समतोल सांभाळणार्या आदर्श अन् तपस्वी आईचा जीवनप्रवास आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील !’
३. कै. (श्रीमती) अरुणा मोहिते यांची नाशिक येथे रहाणारी मोठी कन्या सौ. अनामिका जाधव यांना आईच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे
३ अ. मृत्यूपूर्वी १ मास आधी आईची भेट झाल्यावर ‘गुरुदेव मला जितके दिवस ठेवतील, तितके दिवस मी रहाणार आहे’, असे सांगणार्या आईची परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असणे : ‘आईचे निधन होण्यापूर्वी, म्हणजे ऑगस्ट २०२१ च्या दुसर्या आठवड्यात मी तिला भेटायला पुण्याला गेले होते. तेव्हा तिच्याशी बोलतांना मला शांत वाटत होते. ती मला म्हणाली, ‘‘गुरुदेवांनी मला जसे ठेवले आहे, तसे मी रहाणार आणि ते जितके दिवस मला ठेवतील, तितके दिवस मी रहाणार आहे.’’ तिची परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा होती. नंतर ती मला म्हणाली, ‘‘आता माझे खरे नाही.’’ त्या वेळी ‘आईला मृत्यूची पूर्वसूचना मिळाली असावी’, असे मला वाटले.
३ आ. निधनानंतर आईचा तोंडवळा शांत वाटणे आणि आईच्या पार्थिवाशेजारी बसल्यानंतर ‘आई गुरुदेवांच्या चरणी विलीन झाली आहे’, असा विचार येणे : निधनाच्या दुसर्या दिवशी, म्हणजे ११.९.२०२१ या दिवशी सकाळी ९ वाजता आईचे पार्थिव घरी आणले. तेव्हा तिचा तोंडवळा शांत दिसत होता. त्या वेळी घरातही शांत वाटत होते. तिच्या पार्थिवाशेजारी बसल्यानंतर ‘ती गुरुदेवांच्या चरणी विलीन झाली आहे’, इतकाच विचार माझ्या मनात येत होता. तिच्या त्वचेचा स्पर्श मुलायम जाणवत होता. ‘गुरुदेव आईला निश्चितच पुढची गती देतील’, असे मला जाणवले.’ (१६.९.२०२१)