पणजी, २० सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात पैसा आणि राजकीय संबंध असलेल्यांनाच नोकर्या मिळतात, इतरांना नाही, असा आरोप आम आदमी पक्षाचे संस्थापक तथा देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. गोमंतकीय जनतेशी संवाद साधण्यासाठी २० सप्टेंबरला दुपारी ३ वाजता त्यांचे गोव्यात आगमन झाले. दुपारी केजरीवाल यांनी दोनापावला येथील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या गोवा भेटीमध्ये ते पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्या बैठका घेतील. केजरीवाल यांनी मागच्या गोवा भेटीच्या वेळी प्रतिमास ३०० युनिटपर्यंत वीज विनामूल्य देण्याची घोषणा केली होती. या वेळी ते कोणती नवीन घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.