पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांनी मनुष्य आणि मनुष्यजन्म यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

१. माणसाकडे पैसा अधिक झाल्याने तो निसर्गाप्रमाणे न वागता विनाकारण वैद्यांकडे जात असणे आणि वैद्य त्याचा अपलाभ घेत असणे

‘माणसाला जेवढे रोग होत आहेत, तेवढेच रानावनात रहाणार्‍या पशूपक्ष्यांनाही होतात. त्यांनाही सर्दी आणि ताप असे रोग होतात; परंतु त्यांना कुणी वैद्यांकडे नेतात का ? ते आपोआपच बरे होतात, तर काही मरतात. त्याचप्रमाणे माणसेही वैद्यांकडे गेली, तरी त्यांतील काही मरतात. कितीही महागड्या (भारी) गोळ्या-औषधे खात असला, तरी तो मरतोच. रानात पशूपक्ष्यांचे बाळंतपण कोण करतो ? सध्या स्त्रियांचे ‘सिझेरियन’ शस्त्रकर्म करावे लागते. अरे, देवाने ठेवलेल्या वाटेने जीव बाहेर येणारच आहे; परंतु माणसाकडे पैसा खुळखुळायला लागला. तो त्याला गप्प कसा बसू देणार ? मग तो तज्ञ आणि महागडे (भारी) आधुनिक वैद्य (डॉक्टर) करतो; पण तरीही मरतो. परमेश्वराने ठेवलेल्या वाटेने २ पायांचे सोडा, ४-४ पाय घेऊन तेवढ्याच जागेतून बाहेर येणारे प्राणी पहा ! आता बाईचे पोट दुखायच्या आधीच तिला रुग्णालयामध्ये भरती करतात. सध्या वैद्यांची चांदी झाली आहे; कारण सध्याचा समाज भित्रा झाला आहे. वैद्य त्याचा लाभ घेत आहेत.’

पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज

२. जन्माला आलो आहे आणि परत जायचे आहे, याची आठवण कुणीही न ठेवणे

‘आम्ही जन्माला आलो, ते परतीचे (रिटर्न) तिकिट काढून आलो आहे; परंतु ‘परत जावे लागणार आहे’, याची आठवण कुणी ठेवत नाही. तारुण्यामध्ये बेधुंद होतात. तेव्हा आम्ही ‘काय करावे ?’, ते सांगतो; पण ते ऐकत नाहीत.’

३. मनुष्याने प्रचंड शक्तीच्या हत्तीलाही स्वतःच्या कह्यात ठेवणे

‘ऐरावत रत्न थोर । परी तया अंकुशाचा मार ।।’ एवढा मोठ्या शक्तीचा हत्ती; परंतु मनुष्य हत्तीला चाबकाने मारून वठणीवर आणतो. तेव्हा हत्ती मनुष्याने त्याला दिलेल्या अन्नाची आठवण ठेवतो. तो आपल्या धन्यावर पिसाळत नाही. तो पिसाळला, तर एका सेकंदात धन्याच्या चिंधड्या उडवेल ! एवढी हत्तीमध्ये शक्ती आहे.’

४. पृथ्वीवर कलि पिसाळला असल्याने येथे माणुसकीचा लवलेशही नसणे आणि स्वार्थ बळावल्याने कुणालाही कुणाची पर्वा नसणे

‘पृथ्वीवर कलि पिसाळला आहे. त्याने आपले राज्य स्थापन केले आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या धर्माच्या चार पायांपैकी दोन पाय मोडले आहेत. लोक केवळ अर्थ आणि काम धरून बसले आहेत; म्हणून पृथ्वीवर पाप चालू आहे, माणुसकीचा लवलेश नाही, स्वार्थ बळावला आहे आणि कुणाला कुणाची पर्वा नाही. आपली तुंबडी भरली पाहिजे. दुसरा खड्यात गेला, तरी चालेल. भोग भोगणे, चमचमीत खाणे यांमुळे रोग वाढून अर्धी प्रजा रुग्णालयात आहे.’

५. षड्रिपूंनी वायुरूपाने देहात धमाल करणे आणि देहात कायम त्यांची सत्ता नसून सर्व सत्ता परमेश्वराची असणे

षड्रिपू वायुरूपाने देहात धमाल करतात. इथे आपण एकमेकांची प्रेते बघायला आणि एकमेकांना पोचवायला आलो आहोत. आमची सत्ता इथे कायमची नसून इथे परमेश्वराची सत्ता आहे.’

६. देवाने सर्वकाही देऊनही मनुष्याला कृतज्ञता अल्प असणे

‘मनुष्याला विचारले, ‘‘काय हो हा उजेड कुणाचा ? भूमी, पाणी, वायू, झाडे, फळे आणि फुले कुणाची ?’’ तो म्हणतो, ‘‘देवाचे.’’ ‘‘तुला गर्भामध्ये असतांना हात-पाय, डोळे, नाक, कान कुणी दिले ?’’ असे विचारल्यावर तो म्हणतो, ‘‘देवाने.’’ सगळे देवाने दिले आहे, तर मग तू त्याची भक्ती का करत नाहीस ?’

– पू. (ह.भ.प.) कै. सखाराम रामजी बांद्रे, मु.पो. निवळी (कातळवाडी), ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

(पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)

(संदर्भ : लवकरच सनातन संस्था प्रकाशित करणार्‍या ग्रंथातून)